माथेरानच्या कपाडिया मार्केटच्या निकृष्ट कामाची चौकशी !

| माथेरान | वार्ताहर |

माथेरान मधील कपाडिया मार्केटच्या नुतनीकरणाच्या कामात ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले.असा आरोप माजी नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी केला होता. तसेच या कामाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाही करण्याची मागणी देखील संबंधित विभागाकडे केली होती. त्यामुळे आत्ता या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी कर्जत यांनी दिले आहेत.

माथेरान मध्ये मागील काळापासून अनेक विकासकामे सुरू आहेत. या मध्ये येथील कपाडिया मार्केटचे काम देखील सुरू होते. परंतु या बांधकामामध्ये संबंधित ठेकेदारामार्फत वापरण्यात आलेले साहित्य ज्यामध्ये पत्रे, पाईप, लोखंडी अँगल असे अनेक साहित्य हे निकृष्ट दर्जाचे होते. या संदर्भात माजी नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी रितसर तक्रार नगरपालिकेला केली होती. आणि पालिकेच्या अधिकारी वर्गाला कामाच्या जागी घेऊन येऊन कामाचा दर्जा देखील किती खालच्या पातळीचा आहे हे सुद्धा दाखवले होते. आणि या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नगरपालिकेचे किती मोठे नुकसान होत आहे हे देखील दाखवीले होते. नगरपालिकेकडून संबंधित ठेकेदाराला पंधरा हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला होता. आणि या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी माजी नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी उपविभागीय अधिकारी कर्जत यांना देखील केली होती.

या अनुषंगाने या कामाची चौकशी उपविभागीय अधिकारी कर्जत यांच्या मार्फत करण्यात येत असून या संदर्भात उपविभागीय अधिकारी कर्जत यांच्या कडून माथेरान अधिक्षक यांना या संदर्भात अर्जदार शिवाजी शिंदे यांनी नमूद केलेल्या मुद्यांची, बाबींची नियमोचित कारवाही करावी आणि या कामाचे देयके अदा न करण्याबाबत सांगितले असून तसे पत्र देखील देण्यात आले आहे. यावर अधीक्षक यांनी देखील या संदर्भात नगरपालिकेला पत्र व्यवहार केला आहे.

Exit mobile version