| तळा | वार्ताहर |
तालुक्यातील रहाटाड येथे बांधण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या अंगणवाडीचे बांधकाम अखेर ठेकेदाराकडून हटविण्यात आले असून, चांगल्या दर्जाचे साहित्य वापरुन नव्याने बांधकाम करण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले आहे.
रहाटाड येथे ग्रामपंचायत हद्दीत जवळपास सहा महिन्यांपूर्वी अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, हे बांधकाम करीत असताना त्या ठिकाणी असलेल्या जुन्या वास्तूच्या विटा व इतर साहित्य वापरण्यात आले असल्याने या अंगणवाडीचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप रहाटाड सरपंच चांगदेव पाटील यांनी केला होता. तसेच अंगणवाडी बांधकामाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणीदेखील सरपंच चांगदेव पाटील यांनी संबंधित विभागाकडे केली होती. अखेर संबंधित ठेकेदाराने अंगणवाडीचे झालेले निकृष्ट दर्जाचे बांधकाम तोडले असून, चांगल्या दर्जाचे मटेरियल वापरून बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन रहाटाड सरपंचांना दिले आहे. यामुळे सरपंच चांगदेव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, ठेकेदाराने घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.