| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत उन्हाळयात तसेच काही दिवसांपूर्वी वडवली येथे घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. नेरळ पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्या चोराचा मागोवा घेतला असता अट्टल चोर गौतम माने यास पकडून आणले आहे. त्याच्याकडून तब्बल अर्धा किलो सोने हस्तगत केले असून, त्याच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून नेरळ पोलिसांनी 2019 मध्ये देखील अशीच कारवाई करून 55 तोळे सोने जप्त केले होते.
कर्जत तालुक्यात एप्रिल व जून महिन्यात झालेल्या दोन मोठ्या घरफोड्यांचा छडा लावत पोलिसांनी तब्बल अर्धा किलोहून अधिक सोने चोरून पसार झालेल्या आरोपीस अटक केली आहे. नेरळ- कर्जत राज्यमार्ग रस्त्यावरील वडवली येथील घरफोडी प्रकरणी नेरळ पोलिसांनी प्रभारी अधिकारी शिवाजी धावले यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी करताना भिवपुरी स्थानकातून लोकल पकडून पसार होणाऱ्या चोराचा मागोवा घेतला. त्यानंतर त्या अट्टल चोराला पकडले असून, गौतम माने या चोरांवर अनेक पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. नेरळ पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पोलीस उप निरीक्षक संदीप फड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
वडवली येथील घरफोडीमध्ये चोरी केलेले सोने गौतम माने याने ठाणे जिल्ह्यातील चोरलेले दागिने दिवा येथील एका सोनाराला विकले होते. सध्या त्या दिशेने अधिक चौकशी सुरू असून, मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. गौतम माने याच्यावर यापूर्वीही सोनसाखळी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस त्याच्या इतर गुन्ह्यांचीही चौकशी करत आहेत. या कारवाईसाठी रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर अधीक्षक अभिजित शिवथरे व उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने कार्य केले. आरोपीस न्यायालयात हजर केल्यानंतर आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, शुक्रवारी (दि.27) पर्यंत त्याची चौकशी सुरू राहणार आहे.
2019 मध्ये गौतम माने कडून 55 तोले सोने हस्तगत
नेरळ तसेच आजुबाजुंच्या पोलीस ठाण्यामध्ये 11 गुन्हे दाखल असलेल्या गौतम माने याच्यावर नेरळ पोलिसांनी 2019 मध्ये देखील कारवाई केली होती. त्यावेळी 55 तोळे सोने हस्तगत करण्याची कारवाई झाली होती आणि 11 गुन्हे उघडकीस आले होते अशी माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी आणि आताचे रत्नागिरी जिल्हा पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी ही माहिती दिली आहे.







