नवीन पनवेल परिसरात साथीच्या आजारांना आमंत्रण

| पनवेल । वार्ताहर ।

एकीकडे पनवेल महानगरपालिका स्वच्छता सर्वेक्षणात सर्वोत्तम स्थान मिळविण्यासाठी पालिका प्रशासन विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबविते तर दुसरीकडे नविन पनवेल शहरात अस्वच्छताचे साम्राज्य दिसत आहे.

पालिकेच्या ‘स्वच्छ भारत’ सर्वेक्षण 2.0 मोहिमेच्या जनजागृतीसाठी ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसडरपदी प्रसिध्द क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि मराठी इंडियन आयडॉल स्पर्धेचा विजेता सागर म्हात्रे यांची निवड केली. तसेच शहर स्वच्छ रहावे यासाठी सर्वसामान्य कर भरणार्‍या नागरिकांना महापालिकेकडून नियमावली सांगितली जात आहे. त्याप्रमाणे पालिकेकडून अनेक कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये स्वच्छतेची सवय व्हावी, घन कचरा व्यवस्थापन चांगल्या पध्दतीने व्हावे, शौचालयांची स्वच्छता अशा अनेक कार्यक्रमांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी केंद्र शासनाच्यावतीने ‘स्वच्छ भारत’ हे अभियान राबविले जात असताना नविन पनवेल शहरातील वाढते बेकायदेशीर चिकन, मटण , मासे विक्रेते यांच्यावर महापालिकेचे कसलेही नियंत्रण नाही. यामुळे आदई सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य दिसत आहे.

बेकायदेशीर फेरीवाल्यांकडून नविन पनवेल बसस्थानक परिसरात रस्त्यावर कचरा टाकला जातो. तसेच रेल्वेस्थानक समोरील मार्गावर बेकायदेशीर रोज बाजारातील खाऊगल्ल्या राजरोसपणे गटारीत घाण टाकत असल्यामुळे डांसाची पैदासमध्ये वाढ होऊन या परिसरात साथीच्या आजारांना आमंत्रण मिळते. याकडे महापालिकेचे अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करताना दिसतात. सर्वसामान्य नागरिकांना कागदी व देखाव्या असलेले स्वच्छता बाबतचे कार्यक्रम राबवून खोट्या जाहिरातबाजी करुन नागरिकांच्या कर भरलेल्या पैशाची महापालिकेकडून उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

Exit mobile version