धोकादायक डीपींना सुरक्षाकवच

माणगाव महावितरणचा पुढाकार; नागरिकांना दिलासा

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव शहरातील मोर्बा रोड-दिघी-पुणे मार्गालगत तसेच निवासी संकुलांच्या जवळ असलेल्या वीज डीपीभोवती अखेर लोखंडी सुरक्षा कठडे उभारण्याचे काम महावितरणने हाती घेतले आहे. 28 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या कामामुळे रहिवासी, पादचारी आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

डीपीभोवती वेल्डिंग आणि फेन्सिंगचे काम सुरू असून, या परिसरात लहान मुले खेळत असल्याने बालसुरक्षेचा प्रश्न गंभीर होता. खेळताना चेंडू किंवा अन्य वस्तू डीपीच्या परिसरात गेल्यास मुले धोकादायक विद्युत यंत्रणेजवळ जाण्याची शक्यता होती. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी केलेली ही उपाययोजना नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे. सुरक्षा कठड्यांमुळे नागरिकांना विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राहण्याबरोबरच डीपीमधील कॉईल, तेल किंवा अन्य विद्युत साहित्याच्या संभाव्य चोरीलाही आळा बसण्याची अपेक्षा आहे.

माणगाव शहरातील खांदाड गावात सार्वजनिक शौचालयाजवळ असलेल्या वीज डीपीच्या अगदी लगत घरे, निवासी चाळी आणि नागरिकांची वर्दळ आहे. त्यामुळे या डीपीभोवतीही तातडीने मजबूत लोखंडी कठडे व फेन्सिंग उभारावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांनी सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तालुक्यातील विविध ठिकाणी डीपीभोवती सुरक्षा कठडे उभारण्यात येत आहेत. निवासी परिसर, पादचारी व वाहनांची वर्दळ असलेली ठिकाणे तसेच संभाव्य धोकादायक डीपींना प्राधान्य दिले जात असून, गरजेनुसार दुर्गम भागातील डीपींनाही सुरक्षाकवच देण्यात येईल. वीज यंत्रणेजवळ दुर्घटना घडण्याची वाट न पाहता आधीच सुरक्षेची उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. माणगावमध्ये सुरू झालेला हा उपक्रम तालुक्यातील सर्व धोकादायक डीपींपर्यंत पोहोचावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Exit mobile version