पाटबंधारे विभागाचा दुर्लक्षितपणा चव्हाट्यावर

कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांना झडपा लावण्याचा विसर

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील एक नदी वगळता अन्य दोन मुख्य नद्या या उन्हाळ्यात कोरड्या असतात. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होत असते आणि ती पाणीटंचाई दूर करण्यासाठी या नद्यांमध्ये कोल्हापूर टाईपचे बंधारे बांधण्यात आले आहेत. ‌‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या तत्त्वाने पाणी अडविण्यासाठी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात पाणीसाठा होण्यासाठी त्या सिमेंट बंधाऱ्यांना झडपा लावण्यात येत असतात. मात्र, डिसेंबर महिना सुरू झाला तरी अनेक सिमेंट बंधाऱ्यांना झडपा लावण्याचा पाटबंधारे विभागला विसर पडल्याचे चित्र दिसत असून, या विभागाचा दुर्लक्षितपणा चव्हाट्यावर आला आहे.

कर्जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या उंच सखल भागांचा बनला आहे. त्यामुळे या तालुक्यात असलेल्या दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असते. तालुक्यात उल्हास ही मुख्य नदी आणि चिल्हार तसेच पोश्री या अन्य दोन्ही नद्यांशिवाय कर्जत तालुक्यातील अन्य उपनद्या आहेत. यातील उल्हास नदीच्या पात्रात टाटा धरणाचे पाणी आल्यानंतर ही नदी बारमाही होते. तर, अन्य दोन्ही नद्या आणि उपनद्या या उन्हाळ्यात कोरड्या असतात. त्यामुळे या भागात निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत.

उल्हास नदीवर उगम स्थानापासून आंबिवलीपर्यंत तसेच चिल्लार आणि पोश्री या नद्यांवर अनेक भागात सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. हे बंधारे कोल्हापूर टाईपचे असून, त्या ठिकाणी पाणीसाठा कायम राहावा म्हणून पावसाळा संपला की लोखंडी प्लेट लावून पाणी अडविले जाते. ते पाणी उन्हाळ्यात जनावरे आणि मुक्या प्राण्यांसाठी फायदेशीर ठरत असते. पावसाळा संपला की साधारण नोव्हेंबर महिन्यात सिमेंट बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा व्हावा म्हणून लोखंडी प्लेट लावून कोल्हापूर टाईपने पाणी अडविले जात असते.

डिसेंबर उजाडला तरी कार्यवाही नाही
यावर्षी डिसेंबर महिना सुरू झाला तरी सिमेंट बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्याचा कार्यवाही पाटबंधारे खात्याने पूर्ण केलेली नाही. यातील काही बंधारे हे शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या पशूंच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने शेतकरी या बंधाऱ्यात पाणी अडवले जावे यासाठी उत्सुक आहेत. मात्र, शासनाच्या यंत्रणेकडून पाणी अडविण्याची कार्यवाही अद्याप सुरू केली नाही, असे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. कोल्हापूर टाईप बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी आता शेतकरी वर्गाकडून दबाव टाकला जात आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
काही ठिकाणी याच बंधाऱ्यातील पाण्याचा वापर शेतकरी भाजीपाला शेती आणि रोपवाटिका निर्माण करण्यासाठी करीत असतात. त्यामुळे पाणी अडवले गेले नसल्याने शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. तर, त्याहून मोठे नुकसान हे कोरड्या राहणाऱ्या नद्यांमध्ये पाणी अडविण्यासाठी बांधलेले बंधारे कोरडे राहिल्यास जनावरांचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी वर्गाने सिमेंट बंधारा पाणी अडविण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
Exit mobile version