| अलिबाग | विशेष प्रतनिधी |
रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. ‘दरड कोसळण्याचे स्पॉट बदलत आहेत. जे आहेत त्या ठिकाणी दुर्घटना होत नाही. इतर ठिकाणी होत आहेत. पाऊसाचा पॅटर्न बदलला आहे. पाऊस एकत्रित पडतोय. टीम तयार ठेऊनही, अंदाज लावता येत नाही’, असे त्यांनी म्हटले आहे.
इर्शाळवाडीत झालेल्या या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, या परिसरात 48 घरं, 225 वस्ती आहेत. येथे रस्ता नसल्यानं सव्वा तास पायी चालून घटनास्थळी पोहचावं लागतं. प्रचंड पाऊस सुरु असल्याने मदतकार्यात प्रचंड अडचणी येत आहे. या ठिकाणी जेसीबी जाऊ शकत नाही. काल रात्रीपासून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रशासन संपर्कात आहे. याशिवाय, मुख्यमंत्री मदतकार्याचे लक्ष ही असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जेसीबी एअर लिफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. सध्या या ठिकाणी हेलिकॉप्टर पोहचू शकत नाही. आत्तापर्यंत 7 जणांचे मृतदेह मिळाले आहेत. पण यामध्ये बचावकार्यात 80 जणांना वाचवण्यात यश आले आहे. अजूनही बचावकार्य सुरुच आहे. नेमके किती लोकं अडकले आहेत, याची माहिती नाही. पण मदतकार्यात आकडा स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
मदतकार्यात अडचण
या ठिकाणी मोठा पाऊस पडत असल्याने परिसरात चिखल झाला आहे. त्यामुळे मदतकार्य हातानं करावं लागतं आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे. पावसाचा पॅटर्न बदलला आहे. पाऊस एकत्रित पडत आहे. टीम तयार ठेऊनही, अंदाज लावता येत नाही, अशी परिस्थिती असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.