भविष्यात मोठा धोका उद्भवण्याची शक्यता
| पाताळगंगा | वार्ताहर |
पाली खोपोली रस्त्यावर पाली फाटा ते देवन्हावे रस्त्याच्याकडेला पिण्याच्या पाईपलाइन आहे. पाईपलाइनच्या बाजूलाच महानगर गॅसलाईनचे काम सुरूआहे. भविष्यात पाण्याची पाईलाईन किंवा गॅसलाईन फुटल्यास मोठा धोका होऊ शकतो तसेच रस्त्याच्या बाजूलाच खोदकाम सुरू आहे. बॅरिकेट्स आणि सुरक्षेची व्यवस्था नसल्यामुळे अपघाताची शक्यता आहे.
अॅडलॅब इमॅजिकाजवळ सीएनजी पंपासाठी महानगर पाईलाईन टाकण्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. रस्त्याचा काही अंतर सोडून खोदकाम केलं पाहिजे; परंतु सर्व नियम ढाब्यावर बसवून रस्त्याच्या कडेलाच पाईपलाइन टाकली जात आहे. खोदकाम केल्यानंतर रस्त्याच्या बाजूला बॅरिकेट्स लावले नसल्यामुळे अनेक अपघात घडले आहेत. तसेच देवन्हावे ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्याची पाईपलाइन टाकली आहे, त्याशेजारीच महानगर गॅसलाईन टाकण्यात आली आहे. भविष्यात पाईलाईन फुटल्यास जोडणीसाठी वेल्डिंगचा वापर केल्यास महानगर गॅसलाईन गळतीमुळे मोठा अनर्थ घडू शकतो, अशी चिंता स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहे.