इर्शाळवाडी दुर्घटना! आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू

119 जणांना वाचवण्यात यश : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
| मुंबई | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील चौकजवळ असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी (दि.19) रात्री दरड कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 119 जणांना वाचवण्यात यश आले. तर आजपर्यंत दुर्दैवाने 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, सतत पडणारा पाऊस आणि चिखल, धुक्यांमुळे बचावकार्यात अडथळे येत होते. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी जाऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. त्या ठिकाणी अजून काही लोक अडकल्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या यंत्रणेसोबत स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या बचत कार्यात मदत केली. गुरूवारी दिवसभरात एकूण 119 लोकांना वाचवण्यात यश आलं.

नैसर्गिक आपत्ती असल्याने राज्य सरकारपुढे काही मर्यादा आहे. आतापर्यंत या घटनेत 20 जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण जखमी झालेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात येत आहे.
आजही या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून लोकांना धीर देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. घटना घडल्यापासून दोन तासांच्या आत आपली यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचली. गिरीश महाजनांचे विशेष काम आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी या ठिकाणी राहून विशेष लक्ष देत आढावा घेतला. या सर्वांमुळे बचाव कार्यामध्ये गती आली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Exit mobile version