रिषभ पंतचे कर्णधारपद धोक्यात?

| लखनऊ | प्रतिनिधी |

आयपीएलचा यंदाचा हंगाम लखनऊ सुपर जायंट्ससाठी फारसा चांगला ठरलेला नाही. या हंगामात लखनऊ संघाचा खेळ अत्यंत खराब राहिला आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने हंगामातील आपले सर्व 14 साखळी सामने खेळले असून, त्यामध्ये त्यांना केवळ 4 सामने जिंकण्यात यश आले, तर उर्वरित 10 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे यंदा आयपीएलच्या स्पर्धेतून प्लेऑफमधून बाहेर पडणारा लखनऊ हा पहिला संघ ठरला आहे. लखनऊ संघासाठी यंदाचा आयपीएल हंगाम निराशाजनक ठरल्याने संघात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. जागतिक क्रिकेट संचालक टॉम मूडी यांनी संघ अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचे मान्य केले असून, भविष्यातील नेतृत्वाबाबत गंभीर चर्चा होण्याचे संकेत दिले आहेत. मोठ्या अपेक्षांसह स्पर्धेत उतरलेल्या लखनौ संघाला संपूर्ण हंगामात केवळ 4 सामन्यांत विजय मिळवता आला आणि ते गुणतालिकेत तळाशी राहिले आहेत. हा हंगाम संघाच्या सर्वात खराब हंगामांपैकी एक ठरला आहे. शनिवारी (दि.23) झालेल्या सामन्यानंतर पंजाब किंग्सकडून झालेल्या पराभवावर बोलताना टॉम मूडी यांनी मान्य केले की कर्णधार रिषभ पंतला नेतृत्वाचा दबाव झेलणे कठीण जात होते आणि त्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवरही झाला. कर्णधारपदाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्याच्यासाठी हा हंगाम खूप आव्हानात्मक ठरला. हे संपूर्ण हंगामातील निकालांमधून स्पष्ट दिसून आले. आम्ही यावर विचार करू, वेळ घेऊ आणि संपूर्ण परिस्थितीचे चिंतन करू, असे टॉम मूडी पंजाब किंग्सविरुद्धच्या पराभवानंतर पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यामुळे पुढच्या वर्षी लखनऊ सुपर जायंट्समध्ये नवा कर्णधार आणि नव्या स्वरूपाचा संघ पाहायला मिळू शकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Exit mobile version