नागाव ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन

गावाच्या विकासाची जबाबदारी अधिकच वाढली : डॉ. कल्याणकर

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

नागाव ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळाल्यामुळे गावाच्या विकासाची जबाबदारी अधिकच वाढली असल्याचे प्रतिपादन कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात केले.


यावेळी व्यासपीठावर सरपंच निखिल मयेकर, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, रायगड जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, माजी जिल्हा परिषद सदस्य कबन नाईक, माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांच्यासहित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. आयएसओ मानांकन प्रमाणपत्र सरपंच निखिल मयेकर यांनी कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते स्वीकारले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले की, नागाव हे गाव एक नसून, एक शहर आहे. नागाव-अलिबाग ही दोन जुळी गावे आहेत. नागाव गावाला शहर म्हटले तरी वावगे ठरणार नाही. नागाव ग्रामपंचायतीने आयएसओ मानांकन प्राप्त केल्यामुळे त्याचा दर्जा कायमस्वरूपी सातत्य राखणेही नागावकरांसाठी एक आव्हान आहे. हे आव्हान नागावकर पेलतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. चौदा मॉडेलमध्ये हे प्रमाणपत्र विभागले गेले आहे. या प्रमाणपत्राचा दर्जा राखण्याचे काम आता ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामविकास अधिकारी यांच्यावर आली आहे.

नागाव गावाचा सरपंच निखिल मयेकर यांच्या रुपाने कायापालट होत आहे, ही बाब ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांसाठी गौरवास्पद आहे. ग्रामपंचायत पातळीवर आयएसओ मानांकन मिळवणारी ग्रामपंचायत नागाव परिसरातील या मानांकनासाठी ग्रामपंचायतचे सुसज्ज कार्यालय, ग्रामपंचायतचे दैनंदिन कामकाज, ग्रामपंचायत करवसुली व्यवस्थापन, नागरिकांना देण्यात येणार्‍या सोयीसुविधा, ई-प्रणाली-एसएमएस सिस्टमद्वारे लोकांना माहिती पुरवण्याची सुविधा, डिजिटलाईजेशन, ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेली विकासकामे, स्वच्छता व प्लॅस्टिक निर्मुलन, विविध व्याख्याने, विविध शिबिरे, ओपन जीम सुविधा, ग्रामदैवत यात्रा व्यवस्थापन, वृक्षारोपण, सामाजिक-आरोग्यविषयक-शैक्षणिक उपक्रम इत्यादी सर्व निकषांचे प्रत्यक्ष मूल्यमापन करून आज हे मानांकन आपल्याला प्राप्त झाले.

कोकण विभागात पाच जिल्हे येत असून, यामध्ये ग्रामपंचायत सरपंच विरोधात अनेक तक्रारी असतात. त्याबाबत विरोधक हे अर्ज करीत असतात. रायगड जिल्हा परिषदेमार्फत ग्रामसेवक कर्मचारी यांची कार्यशाळा घेणे गरजेचे आहे, अशी सूचना रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांना केली.

अधिकाधिक ग्रामपंचायती मानांकनप्रात्प व्हाव्यात
आजचा दिवस हा नागावकरांसाठी आनंदाचा दिवस आहे. 2020 मध्ये मी रायगड जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे हातात घेतली, तेव्हा माझे स्वप्न होते की, जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रामपंचायती आयएसओ मानांकन प्राप्त व्हाव्यात. मी प्रत्येक सभेत माझ्या कर्मचार्‍यांना आवाहन करीत असतो की, प्रत्येकाने ग्रामपंचायत आयएसओ मानांकन प्राप्त करण्यासाठी आव्हान स्वीकारा. आतापर्यंत जिल्ह्यात 50 पेक्षा अधिक ग्रामपंचायती आयएसओ मानांकन प्राप्त झाल्या असून, पुढील दोन महिन्यांत अजून पन्नास ग्रामपंचायती मानांकन प्राप्त करण्यात यशस्वी होतील, यात शंका नाही.

डॉ. किरण पाटील, सीईओ, जि.प.
Exit mobile version