इस्त्रायल-पॅलेस्टिनी संघर्ष पेटला


गोळीबारात दोन पॅलेस्टिनी अधिकारी ठार


तेल अवीव/रामल्लाह: (Israel) इस्रायल आणि पॅलेस्टाइन (palestine) दरम्यान झालेली शस्त्रसंधी मोडली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुरुवारी इस्रायलच्या सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन पॅलेस्टिनी अधिकारी ठार झाले आहेत. इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकमधील जेनिन शहरामध्ये झालेल्या झटापटीत दोन पॅलेस्टिनी सुरक्षा अधिकार्‍यांना इस्रायलने ठार केले असल्याची माहिती पॅलेस्टाइनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली.


मागील काही आठवड्यांपूर्वी इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील सशस्त्र गट हमासमध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. हमास आणि इस्रायलमध्ये तीव्र संघर्ष झाले. हमासने इस्रायलवर जवळपास तीन हजारांहून अधिक रॉकेट डागले. तर, दुसरीकडे इस्रायलने गाझापट्टीवर जोरदार बॉम्ब हल्ले केले. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात पॅलेस्टाइनचे 200 हून अधिक नागरीक ठार झाले. यामध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश होता. तर, हमासच्या हल्ल्यात इस्रायलच्या दहा नागरिकांचा मृ्त्यू झाला होता. आंतरराष्ट्रीय दबाब आणि इजिप्तने केलेल्या मध्यस्थीनंतर इस्रायल आणि हमासने शस्त्रसंधी जाहीर केली.


इस्रायलच्या गोळीबारात एक पॅलेस्टिनी नागरीक जखमी झाला आहे. इस्रायली सैन्याने या घटनेबाबत कोणतेही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. स्थानिक माध्यमांमध्ये दाखवण्यात येणार्‍या छायाचित्रांनुसार, दोन्ही मृत अधिकारी हे पॅलेस्टाइन प्राधिकरणाच्या लष्कराच्या गुप्तचर विभागाचे सदस्य असल्याचे समोर आले आहे. पॅलेस्टाइन प्राधिकरणाच्या ताब्यातील भागांमध्ये इस्रायलच्या जवानांकडून छापेमारी सुरू असते. मात्र, या दरम्यान पॅलेस्टाइनच्या अधिकार्‍यांसोबत कधीही संघर्ष झाला नाही.

Exit mobile version