बनावट कागदपत्राच्या आधारे इस्त्रायल नागरिकाची जमीन बळकावली

चौकडीचा पोलिसांकडून शोध सुरु
पनवेल । वार्ताहर ।
इस्त्राईल देशातील नागरिकाच्या जागी बनावट व्यक्ती उभा करुन तसेच बनावट कागदपत्रे तयार करुन त्याच्या नावे पनवेलच्या गुळसुंदे भागात असलेली कोट्यवधी रुपये किंमतीची जमीन चौघा व्यक्तींनी बळकावल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या आरोपींनी सदरची जमीन बळकावल्यानंतर ती परस्पर दुसर्‍या व्यक्तीला विकुन टाकल्याचे देखील उघडकीस आले आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणातील चौघा आरोपीं विरोधात फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.
तक्रारदार रुवेन बेंजामिन भालकर (75) हे मुळचे इस्त्राईल नागरिक असून त्यांचे आई-वडील पुर्वी पनवेल मधील गुळसुंदे येथील आकुळवाडी गावात कुटुंबासह राहण्यास होते. त्यावेळी आकुळवाडी येथे बेंजामीन भालकर यांच्या नावे शेतजमीन होती. 1973 मध्ये इस्त्राईल सरकारने सर्व जगातील इस्त्राईल नागरिकांना आपल्या देशात परत बोलावल्याने बेंजामिन भालकर हे त्यावेळी आपल्या संपुर्ण कुटुंबाला घेऊन इस्त्राईलमध्ये गेले होते. त्यानंतर बेंजामीन भालकर हे भारतात पनवेल येथे अधुन-मधुन येत जात होते. मात्र ऑक्टोबर 2000 मध्ये बेंजामीन भालकर यांचा इज्राईल देशात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नावे पनवेलमध्ये जमीन असल्याने बेंजामीन भालकर यांचे वारसदार असलेल्या त्यांच्या मुलांचा गुळसुंदे येथे नियमित संपर्क होता. मात्र 2005 मध्ये अंतर्गत युद्ध सुरु झाल्यानंतर भालकर कुटुंबिय 2007 ते 16 या कालावधीत भूमिगत झाले होते. मात्र नंतर रुवेन भालकर हे 2018 मध्ये भारतात आल्यानंतर त्यांची वडीलोपार्जीत जमीन दुसर्‍यांनी बळकावल्याचे व त्याची परस्पर दुसर्‍याला विक्री केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर रुवेन भालकर यांनी सदर जमीन खरेदी विक्री संदर्भातील कागदपत्रे मिळविली असता, वसंत रामदास कोळी याने बेंजामिन भालेकर यांच्या जागी बनावट व्यक्तीला उभे करुन तसेच बनावट कागदपत्रे तयार करुन सदरची जमीन स्वत:च्या नावावर करुन घेतल्याचे व त्यानंतर वसंत कोळी याने सदरची जमीन मोहम्मद यासीन मोहम्मद आरीफ पटेल याला विकल्याचे आढळुन आले. भालकर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी वसंत कोळी, आनंद परमार, अशफाक डाकवे व बनावट बेंजामीन भालकर यांच्या विरोधात फसवणुकीसह बनावटगिरी करुन जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version