इस्त्रोचे आता सूर्याय नमः मोहीम

| नवी दिल्ली | वृत्तसंसथा |

मिशन चांद्रयान नंतर भारत आता सुर्यनमस्कार घालण्याची तयारी करत आहे. सुर्याच्या रहस्यांचा उलगडा करण्यासाठी ईस्रोने जोरदार तयारी सुरु केली आहे. चांद्रयान-3च्या यशस्वी वाटचालीनंतर सुर्याचे अध्ययन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उपग्रहाचा फोटो जारी करण्यात आला आहे. भारताचे सुर्याकडे हे पहिले पाऊल असणार आहे. हा उपग्रह प्रक्षेपणासाठी श्रीहरिकोटा येथे पोहोचलाय. इस्रोने सुर्याचे अध्ययन करण्यासाठी सुरु केलेल्या या मिशनला ‘आदित्य-एल-1’ असे नाव देण्यात आले आहे. सुर्य आपल्या सुर्यमालेतील सर्वात जवळील आणि सर्वात मोठा ऑब्जेक्ट आहे. सुर्याचं अंदाजे वय 4.5 बिलियन वर्ष आहे. सुर्य हायड्रोजन आणि हेलियमपासून बनलेला वायूंचा गोळा आहे.

23 ऑगस्टला चांद्रयान-3 चंद्रावर पोहोचेल असा अंदाज लावला जातोय. त्यानंतर काही आठवड्यानंतर मिशन सुर्य सुरु करण्यात येईल. त्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था 1500 किलोचा रोबोटिक उपग्रह लाँच करणार आहे. यामाध्यामातून सुर्याचे निरीक्षण करण्यात येईल. यासाठी 400 कोटींमध्ये सौर वेधशाळा तयार करण्यात आली आहे. हा उपग्रह सुर्याच्या लाटा आणि सुर्यावर येणाऱ्या वादळांवर नजर ठेवणार आहे. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की, ‘आदित्य एल-1’ सुर्यावर सतत लक्ष ठेवणार आहे. हा उपग्रह आपल्याला सुर्याच्या विद्युत चुंबकीय प्रभावांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची सुचना आधीच देईल. जर वेळेच्या आधी सुचना मिळाली तर उपग्रह, बाकीचे विद्युत साधनांना नुकसान होण्यापासून वाचवले जाऊ शकते.

Exit mobile version