| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आला असतानाही पाली शहरातील पाणीप्रश्न अद्याप सुटलेला नाही. आजही अनेक पालीकरांना गढूळ व दूषित पाणी प्यावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा व फिल्टर योजनेचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र ही योजना नेमकी कुठे अडकली, असा सवाल आता पालीकरांकडून उपस्थित केला जात आहे. नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर शहराच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा नागरिकांना होती. नियमित पाणीपुरवठ्यादरम्यान पाण्याचा रंग गढूळ होणे, पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांच्या तक्रारी निर्माण होणे, अशा समस्या कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
योजना कागदावरच?
पालीकरांसाठी प्रस्तावित असलेली फिल्टर योजना नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे, तिच्या मंजुरीची सद्यस्थिती काय आहे आणि प्रत्यक्ष कामाला विलंब का होत आहे, याबाबत नागरिकांकडून प्रशासनाकडे स्पष्ट माहितीची मागणी होत आहे. नगरपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळून त्या कार्यान्वित झाल्याचे चित्र असताना पालीची पाणी योजना अद्यापही रखडलेली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
निवडणुका आल्या की आश्वासनांचा पाऊस
फिल्टर योजनेच्या नावावर आजपर्यंत अनेकदा आश्वासने देण्यात आली. विविध निवडणुकांच्या काळात पालीकरांना पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची स्वप्ने दाखवण्यात आली; मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या नळाला अद्याप स्वच्छ पाणी मिळालेले नाही, अशी नागरिकांची भावना आहे.नगरपंचायतीचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असताना पाणीप्रश्न कायम राहिल्याने आता या योजनेच्या विलंबाची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न पालीकरांकडून विचारला जात आहे. प्रशासनाने फिल्टर योजनेची सद्यस्थिती, निधी, मंजुरी आणि काम सुरू होण्याची अपेक्षित तारीख याबाबत पारदर्शक माहिती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आश्वासनांपेक्षा आता प्रत्यक्ष शुद्ध पाणी हवे! अशी भावना पालीकरांमध्ये व्यक्त होत असून, आगामी काळात पाणीप्रश्नावर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






