| अलिबाग | प्रतिनिधी |
चेंढरे ग्रामपंचायत व स्व. महेश देशमुख पतसंस्थेच्यातर्फे चेंढरे या ठिकाणी अद्ययावत अशी खुली व्यायामशाळा व अनंत शिवराम दक्षीकर यांच्या नावाचे उद्यान उभारले आहे. अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला आहे, असे कौतुक करत चेंढरे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सोसायटींच्या राखीव ठेवलेल्या खुल्या क्षेत्रात असे उपक्रम राबवावे. याचा फायदा येथील लहान मुलांपासून तरुण मंडळी व ज्येष्ठ व महिला वर्गाला चांगला होणार आहे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले. चेंढरे येथे बांधण्यात आलेल्या खूली व्यायामशाळा व उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राजिप माजी सदस्य संजय पाटील, स्व. महेश देशमुख नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ॲड. परेश देशमुख, राजिप माजी सदस्या प्रियदर्शनी पाटील, चेंढरेच्या सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच प्रणिता म्हात्रे, राम पाटील, दत्ता ढवळे, दिनेश कवाडे, यतीन घरत, संतोष पालकर, मिथून बेलोस्कर, प्रल्हाद म्हात्रे, नाना घरत, नागेश कुलकर्णी, जितेंद्र वाघ, शरद कापसे, राजेंद्र बोराडे, अभिजीत पाटील, अभिजीत सातमकर, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, परिसरातील ग्रामस्थ, कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी आ. जयंत पाटील म्हणाले की, चेंढरेचा विकास हा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. चेंढऱ्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहेत. चेंढरेमध्ये उभारण्यात आलेली पाण्याची टाकीसाठी आपल्या माध्यमातून निधी उपलब्ध केला आहे. चेंढरेमधील वाढत्या लोकसंख्येचा विचार करत याठिकाणी आणखी पाण्याची टाकी बांधण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. चेंढरेमधील रस्ते काँक्रीटीकरण करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. सुसज्ज असे रस्ते झाले पाहिजे ही आपली भूमिका आहे. उद्यान व खुली व्यायाम शाळेचा महिलांसह तरुण, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना फायदा होणार आहे. उद्यानमध्ये बसविलेले कारंजे, उद्यानात फिरण्यास येणाऱ्यांसाठी सिमेंट बाक व वेगवेगळ्या प्रकारची फुल झाडांमधून समाधान प्राप्त होणार आहे. हा उपक्रम खऱ्या अर्थाने कौतूकास्पद आहे, असे गौरोद्गार आ. जयंत पाटील यांनी काढले.