सामूहिक प्रयत्नामुळेच आरडीसीसी देशातील सर्वोच्च बँक; आ.जयंत पाटील यांचे प्रशंसोद्रार

संचालक, अधिकारी, कर्मचार्‍यांचे अभिनंदन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्हा बँकेमार्फत विविध योजना राबवून त्या यशस्वी करण्यात संचालक मंडळ, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे बँक देशात सर्वोच्च ठरली असे प्रशंसोद्गार जिल्हा बँकेचे चेअरमन आ.जयंत पाटील यांनी काढले आहेत.

राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून लौकिक असणा-या रायगड जिल्हा सहकारी बँकेला देशातील सहकार क्षेत्रातील सर्वोत्तम बँक म्हणून इंदोर येथे झालेल्या शानदार कार्यक्रमामध्ये देशाचे माजी केंद्रीयमंत्री व्यक्तिमत्व सुरेश प्रभू यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्या पार्श्‍वभूमीवर आ.जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे यावर्षी बँकेने तब्बल तीन प्रकारांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेला असून ज्यामध्ये बेस्ट क्रेडीट ग्रोथ, बेस्ट ऑडीट इनीशीएटिव्ह, बेस्ट इन्व्हेस्टमेंट इनीशीएटिव्ह या पुरस्कारांचा समावेश आहे. बँकेच्या वतीने हा पुरस्कार बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी हा पुरस्कार स्विकारला. बँकिंग फ्रंटीयर्स या देशातील नामवंत संस्थेकडून हा पुरस्कार दिला जात असून देशातील तब्बल 330 सहकारी बँकांमधून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमामध्ये विशेष अतिथी म्हणून रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे हे देखील उपस्थित होते.

बँकेने कोरोना काळानंतर देखील आपल्या प्रगतीमध्ये तंत्रज्ञान आणि ग्राहकसेवा याच्या आधारे आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखले आहे, शिवाय भविष्यातील योजनांवर अधिक व्यापक भूमिका घेऊन काम बँकेच्या वतीने सुरु असल्याने या कामाची दखल देशपातळीवर घेण्यात येत आहे. त्यामुळे या पुरस्काराचे श्रेय मी बँकेच्या सर्व संचालक मंडळ यांचा एकमती निर्णय, अधिकारी आणि कर्मचारी यांची अमलबजावणी आणि विशेष म्हणजे ग्राहकांनी दाखविलेल्या विश्‍वासाला देईन.

आमदार जयंत पाटील,चेअरमन

रायगड जिल्हा सहकारी बँकेने सातत्याने आधुनिक सेवा आणि तंत्रज्ञानस्नेही बँकिंग याचा स्विकार केलेला असून त्याप्रमाणेच आपल्या बँकिंग व्यवसायामध्ये होणारे बदल आत्मसात करून ग्राहकांना सेवा पुरविल्या आहेत. शिवाय बँकेने कर्जसुविधा अधिक सोपी आणि सहज उपलब्ध व्हावी याकरिता देखील नव्याने अनेक ग्राहकाभिमुख योजना सुरु केल्या आहेत, त्यामुळेच बँकेला वरील पुरस्कार सातत्याने प्राप्त होत आहेत. शिवाय बँकेने मागील 15 वर्षांपेक्षा अधिक काळ ऑडीट मध्ये ‘अ’ वर्ग संपादन केलेला असून विविध आधुनिक सेवा देत असताना पारदर्शकतेवर अधिक भर देत त्याचे देखील ऑडीट करून त्यामध्ये उल्लेखनीय यश मिळविले आहे, आणि त्याकरिता बँकेला हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

ही कामाची पोचपावती
सप्टेंबर 2022 मध्ये बँकेने आपला 4250 कोटींचा व्यवसाय टप्पा पूर्ण केलेला असून बँकेने आपल्या व्यवसायामध्ये अधिक विस्तारीकरण होण्याकरिता विशेष आराखडा तयार केलेला असून त्यादृष्टीकोनातून बँकेचे प्रयत्न सुरु आहेत, मार्च 2023 पूर्वी बँक आपल्या व्यवसायाचा 4500 कोटींचा टप्पा देखील नक्की ओलांडेल असा विश्‍वास यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी व्यक्त केला.

बँकेला मिळालेला हा पुरस्कार 1997 सालापासून बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या दूरदृष्टीपूर्ण कामाची पोचपावती आहे, तसेच बँकेचे ठेवीदार आणि ग्राहक यांचा बँकेवरील विश्‍वास ही आमची फार मोठी ताकद असून यापुढे कामकाजामध्ये सातत्य ठेवणे आणि हे यश वृद्धीगंत करणे ही आमची यापुढे प्रमुख जबाबदारी असेल.

मंदार वर्तक
मुख्य कार्यकारी अधिकारी
Exit mobile version