| पनवेल | प्रतिनिधी |
मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)कडे जाणाऱ्या लोकलमध्ये मद्यधुंद प्रवाशाने अक्षरशः धिंगाणा घालत सहप्रवाशांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याने काही काळ डब्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. “मी चार खून केलेत… पुढचा नंबर तुझा” अशी धमकी देत तो प्रवाशांवर दादागिरी करू लागल्याने एकच खळबळ उडाली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, लोकलमधील सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवासी मद्यधुंद अवस्थेत डब्यात मोठमोठ्याने आरडाओरडा करत होता. सुरुवातीला सहप्रवाशांनी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळातच त्याने अश्लील शिवीगाळ सुरू करत प्रवाशांना धमकावण्यास सुरुवात केली. काहींनी त्याला शांत राहण्यास सांगितल्यावर तो आणखी आक्रमक झाला आणि “मी चार खून केलेत… पुढचा नंबर तुझा”, अशी धमकी दिल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला.
या धमकीनंतर डब्यात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला. अनेक प्रवाशांनी त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला, तर काही धाडसी प्रवाशांनी प्रसंगावधान राखत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर सहप्रवाशांच्या सामूहिक हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि संभाव्य अनर्थ टळला. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, संपूर्ण प्रकार काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला असून, त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित होत आहे. संबंधित व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे की त्याच्याविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
काही दिवसांपूर्वी बोरिवली लोकलमध्ये झालेल्या प्रवाशाच्या हत्येची घटना ताजी असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेबाबतची चिंता अधिकच वाढली आहे. दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करत असल्याने रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिसांची गस्त अधिक प्रभावी करण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत मद्यधुंद आणि उपद्रवी प्रवाशांविरोधात तातडीने कारवाई करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे.







