| उरण | प्रतिनिधी |
शेवा येथील आर.के.एफ.ज.ने. पोर्ट विद्यालयाचा बक्षीस वितरण व स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या शानदार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जेएनपीएचे विश्वस्त दिनेश पाटील, रविंद्र पाटील व पंचायत समिती उरणच्या गटशिक्षणाधिकारी निर्मला घरत उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शाळेच्या वर्षभरातील सहशालेय उपक्रम, विशेष स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेली बक्षिसे आणि शाळेच्या अष्टपैलू कामगिरीच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांचे विशेष अभिनंदन करुन कौतुक केले. आम्ही भविष्यात शाळेच्या आणि कर्मचारी यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून शाळेला गतवैभव प्राप्त करून देऊ, असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेच्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अविनाश म्हात्रे, केवल गावंड, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक गिरीश पाटील, भुषण जाधव, अंकुश जोगळे, मुख्याध्यापिका वैशाली बोरचटे, आर.के.एफ. संस्थेचे पदाधिकारी सना खान, प्रितेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, आर.के.एफ. व्यवस्थापन पदाधिकारी, शालेय सफाई महिला कर्मचारी आणि जे. एन. पी. ए. मेंटेनन्स सर्व विभागातील कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. सर्व वर्ग शिक्षक, स्पेशल शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सदर केलेले सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम एकापेक्षा एक असे दर्जेदारपणे सादर झाले.







