। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांचा विकास होण्याच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. या वर्षीच्या विद्यापीठाच्या कोकण विभाग क्रमांक 04 च्या बुद्धिबळ स्पर्धांच्या आयोजनाचा मान येथील जे. एस. एम. महाविद्यालयास मिळाला आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन आज दिनांक 07 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 08:00 वाजता जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांच्या हस्ते फीत कापून व बुद्धिबळाच्या पटावरील एक चाल खेळून झाले.

सदर स्पर्धेत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 20 मुलांचे संघ व 13 मुलींचे संघ असे एकूण 164 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष, विलास म्हात्रे, सुशील गुरव, आयुष अभाजी व अविष्कार मरभळ स्पर्धेचे अर्बिटर म्हणून काम पाहणार आहेत. मुंबई विद्यापीठातर्फे डॉ. संदीप शिंदे निवड समितीचे अध्यक्ष पद भूषवित असून विनोद नाईक डॉ. योगेश केणी निवड समितीचे सदस्य म्हणून काम पाहतील.
महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख प्रा. रवींद्र चिखले यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सदर स्पर्धेची अत्यंत बारकाईने तयारी केली आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तत्परतेने कार्यरत असल्याचे दिसत होते.