माय मराठीचा जागर

मराठी राजभाषा दिवस जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात आले. विशेष करून विविध शाळांमध्ये विद्यार्थी वर्गासाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानतर्फे मराठी भाषा दिन साजरा

| म्हसळा । वार्ताहर ।

गर्जा प्रतिष्ठान म्हसळा यांच्या विद्यमाने म्हसळा येथील धावीर देवळाच्या पटांगणात मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून निलेश भिसे यांचे धर्मवीर छ. संभाजी महाराज या विषयावर शंभु व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.


गर्जा प्रतिष्ठान आयोजित ऐतिहासिक किल्ले स्पर्धेत उत्तम किल्ले उभारलेल्या बाल कलाकारांनाही यथोचित सन्मानीत करण्यात आले. या वेळी निलेश भिसे यांनी धर्मवीर छ. संभाजी महाराज यांच्या जीवनावर अनेक उदारहाणे देऊन संपूर्ण इतिहास कथन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील यादव यांनी केले. यावेळी सचिन करडे, निलेश भिसे, महादेव पाटिल, नगरपंचायत मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, पोलीस उपनिरीक्षक ज्योती, नंदू गोविलकर, डॉ. महेश मेथा, सुशील यादव, प्रदिप कदम, संजय खांबेटे आदि मान्यवर, ग्रामस्थ, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बोलीभाषांचे महत्त्व विशद

| पनवेल । वार्ताहर ।

पनवेल तालुका विधी सेवा समिती व पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास वीर वाजेकर फुंडे महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक चिंतामण धिंदळे उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, बोलीभाषांचे महत्त्व, अभिजात भाषेच्या दर्जा संदर्भात मराठी भाषेची सद्यस्थिती अशा अनेक विविध पैलूंच्या अनुषंगाने विषयाची मांडणी केली.


यावेळी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष व जिल्हा न्यायाधीश जयराज वडणे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. विचारपीठावरती न्यायालयातील सर्व न्यायाधीश महोदय उपस्थित होते. पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. वकील बंधू-भगिनींनी आणि कर्मचारी वर्गांने या कार्यक्रमाची शोभा वाढविली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्तावना विधी स्वयंसेवक शैलेश कोंडसकर यांनी केली.

निजामपूरात मराठी दिन साजरा

| माणगाव । वार्ताहर ।

जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर येथे मराठीतील ज्येष्ठ कवी, लेखक तसेच नाटककार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन अर्थात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य के. वाय. इंगळे यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी कैलास वाघ, सुनील बिरादार, संदीप निकम, अण्णासाहेब पाटील, अर्जुन गायकवाड, संतोष चिंचकर, मुकेश सुमन, केदार केंद्रेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केदार केंद्रेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य के. वाय. इंगळे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारची मराठी पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला. मराठी भाषेतील विविध साहित्यिक आणि त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृती यावर प्राचार्य के. वाय. इंगळे यांनी आपल्या भाषणात प्रकाश टाकला.


रेल्वे स्थानकात स्वाक्षरी मोहीम

| नेरळ । वार्ताहर ।

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सालाबादप्रमाणे मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. नेरळ रेल्वे स्थानकात यावेळी भव्य रांगोळी आणि मराठी स्वाक्षरी मोहीम घेऊन हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विभाग सहसचिव मंगेश मोहन दळवी यांनी नेरळ-शेलु-वांगणी युनिट अंतर्गत मराठी राजभाषा दिनानिमित्त नेरळ रेल्वे स्थानकात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

यावेळी मराठी राज भाषा गौरव दिनानिमित्त रैवलंय प्रवाशी यांना माहिती देण्यासाठी भव्य रांगोळी काढली होती. तर त्याच ठिकाणी मी मराठी… माझी स्वाक्षरी मराठी.. हि मराठी स्वाक्षरी मोहीम राबविली. यावेळी मिलिंद शेळके, राजा कराळे, मंगेश दळवी, जगदीश राणे, सचिन अहिर आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

विमला तलाव येथे कवी संमेलन

| उरण । वार्ताहर ।

कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व्हावा तसेच मराठी भाषेविषयी जनजागृती व्हावी या अनुषंगाने श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था व कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (दि 27) विमला तलाव येथे मराठी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.


सदर कवी संमेलन प्रसंगी कवी सूर्यकांत दांडेकर, चंद्रकांत मुकादम, मारुती तांबे, एल बी पाटील , भ. पो म्हात्रे, राम म्हात्रे, अजय शिवकर, संजय होळकर, संग्राम तोगरे, मनोज ठाकूर, जयवंत पाटील, दौलत पाटील, केसारीनाथ ठाकूर, रामचंद्र म्हात्रे आदिनी चारोळी, गझल गाऊन मराठी भाषेचा इतिहास, भाषेचा महत्व प्रतिपादित केले.यावेळी सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या अँड गोपाळ शेळके, संजय होळकर, केसरीनाथ ठाकूर, संग्राम तोगरे, दिनानाथ कोळगावकर या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय होळकर यांनी तर आभार प्रदर्शन विठ्ठल ममताबादे यांनी केले.

मराठी भाषा जनजागृती अभियान

| बोर्लीपंचतन । वार्ताहर ।

महाराष्ट्र संरक्षण संघटना व मी मराठी एकीकरण समितीच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्म दिनानिमित्त सोमवार (दि.27) मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि मराठी भाषेचा प्रचार,प्रसार व जनजागृतीसाठी धर्मेंद्र घाग, दिप्ती वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या मराठी भाषा जतन, संवर्धन जनजागृती अभियानात मुंबईचा डबेवाला संघटना आणि मराठी भाषिक प्रेमींनीसुद्धा आपला उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. यावेळी महाराष्ट्र संरक्षण संघटनेचे सरचिटणीस रवींद्र कुवेसकर, प्रवक्ते मंदार नार्वेकर यांच्यासह अजय कदम, सुयोग पवार, नितीन खेतले, श्रीकांत मयेकर, लहू साळवी, रवींद्र शिंदे, अविनाश गोरुले या प्रमुख पदाधिकार्‍यांसह अनेक मराठी प्रेमींनी मराठी भाषा जनजागृती यशस्वी केल्याबद्दल महाराष्ट्र संरक्षण संघटनेने सर्वांचे आभार व्यक्त केले.

वाशी येथे मराठी भाषा दिन साजरा

| अलिबाग | वार्ताहर |

कोकण मराठी साहित्य परिषद,नवी मुंबई शाखेच्या वतीने वाशी येथील गुरव हॉलमध्ये वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास श्यामसुंदर गावकर, मोहन भोईर, पुंडलिक म्हात्रे, प्रा.चंद्रकांत मढवी, रामनाथ म्हात्रे, शांताराम लोखंडे, इक्बाल शेख कवारे उपस्थित होते. मोहन भोईर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. माझी मराठी काल आज व उद्या या परिसंवादात प्रा.चंद्रकांत मढवी यांनी मराठी भाषेच्या इतिहासातील थोर संत व साहित्यिकांच्या योगदानावर भाष्य केले. साहित्य व संस्कृती यांचा संबंध विषद केला. सेवानिवृत्त प्राचार्य श्रीकांत पाटील यांनी मराठी भाषेवरील परकीय भाषांचे आक्रमण होत असताना भाषेचे संवर्धन कसे करता येईल यावर भाष्य केले.


यावेळी मीना दरवेशी यांनी मराठी वाचली तर राज्य वाचेल ही कैफियत मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रामनाथ म्हात्रे यांनी केले. दुसर्‍या सत्रात खुले काव्य संमेलन झाले. त्यात भिवंडी,सातारा, मुरबाड वाशी, खारघर, ठाणे, उलवे येथून आलेले कवी मंगेश म्हात्रे, महेंद्र सूर्यवंशी, जयराम कराळे,वसंत गावडे, स्मिता वाजेकर, शांतीलाल ननावरे, नंदकुमार आवळे यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दमयंती भोईर, स्मिता वाजेकर, पुंडलिक म्हात्रे, शांतीलाल ननावरे, रामनाथ म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेतली.


नेरळ रेल्वे स्थानकात मराठी राजभाषा दिननिमित्त भव्य रांगोळी काढण्यात आली.

Exit mobile version