| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी प्रतिवर्षी दि. 27 फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जेएसएम महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 27 व 28 दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयामध्ये करण्यात आले आहे.
डायमंड प्रकाशन पुणे व बुक सेल अलिबाग यांच्याद्वारा शैक्षणिक तसेच कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र-आत्मचरित्र, प्रवासवर्णने अशा वाचन साहित्यातील दर्जेदार पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री यावेळी महाविद्यालयात केली जाणार आहे.
सोमवार दि. 27 सकाळी 10 वाजता सदर ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सदर ग्रंथ हे सर्व नागरिकांकरिता खुले असून, अलिबागेतील सर्व वाचकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्रा.डॉ. अनिल पाटील यांनी केले आहे. तसेच सकाळी 9.30 वाजता सार्वजनिक वाचनालय ते जेएसएम महाविद्यालय अशा मार्गावर ग्रंथदिंडीचे आयोजनही महाविद्यालयातर्फे करण्यात येणार आहे.