रायगडातील राजकीय समीकरण बदलणार
| रायगड | आविष्कार देसाई |
दोन वर्षांपूर्वी हातावर शिवबंधन बांधलेल्या स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे घड्याळ हातावर बांधले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या भाजपाच्या संपर्कात होत्या. मात्र, समोरुन प्रतिसाद न आल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी वेळ दवडली नाही. त्यांनी तडकाफडकी जगताप यांचा आपल्या पक्षात प्रवेश करुन घेतला. जगताप यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाचे अस्तित्व धोक्यात आले आहे, तर शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे खासदार तटकरे यांनी एका दगडात तीन पक्षी मारले आहेत. जगताप यांना पक्षात घेताना खासदार तटकरे यांनी त्यांना कोणती कमिटमेंट केली आहे. हे मात्र उमगलेले नसले, तरी रायगडच्या राजकारणातील समीकरण मात्र बदलणार आहेत.
काँग्रेसमध्ये असलेल्या स्नेहल जगताप यांनी दोन वर्षांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. ठाकरे गटाकडून त्यांनी विधानसभेची निवडणूकहीदेखील लढवली होती. त्या निवडणुकीत भरत गोगावले यांनी त्यांचा पराभव केला होता. जगताप यांना निवडणुकीत 91 हजार 232 मते मिळाली होती. आता मात्र त्या शिवसेना ठाकरे गटाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी बुधवारी मुंबईत पक्षप्रवेश केला. त्यामुळे आता ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिशाहीन झाले आहेत. तर, शिंदे सेना झोपेतून जागी झाली आहे.
सत्ता जिथे असेल तेथे तटकरे असतात, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपण पाहात आलो आहोत. तटकरे यांच्या कन्या आदिती या कॅबिनेट मंत्री आहेत. ते सत्तेत सहभागी असल्याने त्यांचे रायगडातील राजकारणावर पर्यायाने विकासावर त्यांचेच वर्चस्व राहणार, हे काही लपलेले नाही. तटकरे यांनी नेहमीच आपल्या प्रतिस्पर्ध्यांना रोखले आहे. त्यामध्ये स्नेहल जगताप यांचे वडील माणिक जगताप यांचादेखील समावेश आहे. याचा विसर कदाचित स्नेहल यांना पडला असेल. 2009 मध्ये माणिकराव हे विधानसभेवर निवडून गेले होते. त्यावेळी त्यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती, मात्र तटकरे समोर असल्याने त्यांना ते मिळाले नाही. त्यानंतर त्यांचा पराभव झाला होता. त्यांच्या पराभवाला दस्तुरखुद्द खासदार तटकरे जबाबदार असल्याचे माणिकरावांनी विविध सभांमधून बोलून दाखवले होते. ज्यांनी वडिलांच्या राजकारणात अडथळे निर्माण केले, त्यांनाच आता स्नेहल जगताप या सोबत करत आहेत. आपल्या वडिलांसोबत जे काही घडले अथवा ज्यांनी घडवले याचा सोयीस्कर विसर स्नेहल जगताप यांना कसा काय पडला, असा प्रश्न रायगडातील जनतेला पडला आहे. तटकरेंनी अशी कोणती जादुची कांडी फिरवली आहे, हे अद्याप कळायला मार्ग नाही. मात्र, जगताप यांना आपल्या पक्षात घेतल्याने ठाकरे गटाची कोंडी झाली आहे. पक्षसंघटन वाढत असल्याने शिंदे गटाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. मंत्री भरत गोगावले यांना शह देण्यासाठीच तटकरे यांनी स्नेहल यांना पक्षात घेतल्याची चर्चा आहे.