जय भवानी क्रिकेट संघाने अजिंक्यपद पटकावले

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण गुणवत्तेला वाव देण्यासाठी धारवली कुणबी विकास मंडळाच्यावतीने नालासोपारा येथील फनफिस्ट मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जय भवानी क्रिकेट संघाने झळाळती कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले.

स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना शाखाप्रमुख विवेक पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेत कम्पल्सरी चेसच्या नियमामुळे प्रत्येक चेंडूवर धाकधूक वाढली होती. अंतिम सामन्यात मात्र जय भवानी संघाने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन घडवले. अचूक गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्यांनी विजयश्री खेचून आणली. विजेत्या जय भवानी संघाला 15 हजार रुपये व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. द्वितीय क्रमांकाला 7 हजार रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकाला 3 हजार रुपये व चषक देण्यात आला. यासोबतच स्पर्धेतील मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. अंतिम सामन्याच्या निकालानंतर बक्षीस वितरण समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीवर्धन तालुक्यातील नेते सुजित तांदळेकर यांनी विशेष उपस्थिती लावली. तांदळेकर यांनी विजेत्यांना शुभेच्छा देतानाच खेळाडूंना प्रोत्साहन दिले. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळते. खेळातील जिद्द आणि संघभावना तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या स्पर्धेचे शिस्तबद्ध नियोजन करण्यासाठी अमित, बंटी, हितेश, प्रतीक, विजय, नैनेश आणि विशाल यांसह धारवली कुणबी विकास मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. पारदर्शक पंचगिरी आणि शांततेत पार पडलेल्या या स्पर्धेचे क्रीडाप्रेमींनी भरभरून कौतुक केले आहे.

Exit mobile version