सामूहिक आंदोलन करण्याचा इशारा
| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई महापालिकेने दादर पश्चिम येथील कबूतरखाना पुन्हा एकदा ताडपत्रीने झाकला आहे. यापूर्वी 6 ऑगस्ट रोजी जैन धर्मियांनी आंदोलन करत ताडपत्री हटवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. कबूतरखाना बंदच ठेवण्यात येणार असून, पुढील सुनावणी 13 ऑगस्ट रोजी होणार आहे.
रविवारी रात्री महापालिकेने पोलिसांच्या मदतीने कबूतरखाना झाकला आणि परिसरात बॅरिकेडिंग केली. तसेच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीने बुधवारी दादर कबूतरखाना येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा मोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी समितीने केली आहे. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी कायदा सुव्यवस्था बिघडवल्यास लाखोंनी मोर्चे काढण्याचा इशारा दिला आहे. तर जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी “गरज पडल्यास आम्ही शस्त्र पण उचलू,“ असे वक्तव्य केले आहे. त्यांनी सरकारला आव्हान देत, अपेक्षा पूर्ण न झाल्यास कबूतरखान्यातच सामूहिक आंदोलन करण्याचा इशारा दिला.







