घाटमाथ्यावर वाघेरेची जमेची बाजू

| पनवेल | वार्ताहर |

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पुणे आणि रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. घाटमाथ्यावर जास्त मतदार असून ही संख्या जवळपास दीड लाखाहून अधिक आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना आपल्या घरच्या मैदानावर जास्त मताधिक्य मिळवावे लागणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही बाजूने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, आणि मावळ तर रायगडमधील पनवेल, उरण तसेच कर्जत- खालापूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. भौगोलिकदृष्ट्या हा मतदारसंघ संपूर्ण राज्यात वेगळा आहे. येथे 2009 पासून शिवसेनेचा भगवा फडकत आला आहे. गजानन बाबर आणि त्यानंतर श्रीरंग बारणे यांनी दोनदा या मतदारसंघाचे नेतृत्व केले. घाटावरील मतदारांची संख्या सुरुवातीपासून जास्त राहिलेली आहे. विशेष करून, पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रात दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. तेथील मतदारांची संख्या नऊ लाख 60 हजार आहे. तर मावळ विधानसभा मतदारसंघात तीन लाख 67 हजार मतदार आहेत. म्हणजेच ही संख्या 13 लाखांहून अधिक आहे. तर घाटाखालील सर्वाधिक पनवेल विधानसभा मतदारसंघात पाच लाख 65 हजार इतके मतदार आहेत. कर्जत आणि उरण विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे 3,04,523 व 3,09,275 इतके मतदार आहेत. हा आकडा 11 लाख 79 हजार इतका आहे. घाटमाथ्यावरील मतदारांची संख्या जास्त असल्याने साहजिकच दोन्ही बाजूने तेथील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

2009ला आजम पानसरे आणि गजानन बाबर यांच्यात लोकसभेची लढाई झाली. त्यानंतर श्रीरंग बारणे या स्थानिक उमेदवाराला शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधामध्ये अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट दिले होते. मात्र, तेथे नार्वेकरांना विजय मिळवता आला नाही. मागील निवडणुकीत पार्थ पवारांना उमेदवारी देण्यात आली. पवार घराणे हे पुणे जिल्ह्यातील आहे. घाटाखाली आत्तापर्यंत एकदाही संधी दोन्ही बाजूंनी देण्यात आली नाही. आताही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून संजोग वाघेरे निवडणूक रिंगणात आहेत. वाघेरे हे पिंपरी- चिंचवड महापालिकेचे नगरसेवक, सभापती आणि महापौर राहिले आहेत. त्यांचे वडीलसुद्धा सरपंच आणि महापौर होते.

Exit mobile version