। मुरुड । प्रतिनिधी ।
मुरुड- जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी येत असते. अचानक हवामानात बदल झाल्यामुळे शिडाच्या बोटी बंद करण्याचा निर्णय बंदर खात्याने घेतला. त्यामुळे जंजिरा किल्ला नऊ दिवस बंद राहिल्याने आलेल्या लाखो पर्यटकांना किल्ल्या पाहण्यास न मिळाल्याने हिरमोड झाल्याचे पाहावयास मिळाले. अखेर सोमवारी (दि.3) तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांना जंजिरा किल्ला पाहण्यासाठी खुला झाला आहे असे पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यांनी सांगितले आहे.
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील राजपुरी येथे असलेला जगप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दिवाळी सुट्टीतील वीकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. परंतु, हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार अचानक हवामानात बदल घडून आले व समुद्रातील हवेने वेग धरला त्यामुळे शिडाच्या बोटी समुद्रात चालवणे अवघड होऊ लागले. दुरून दुरून आलेल्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू नये म्हणून त्यांच्या सुरक्षतेसाठी बंदर विभागाकडून बोटी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, नागपूर, अहमदनगर, अकोला, बुलढाणासह अनेक जिल्ह्यातून व महाराष्ट्र बाहेरून सुद्धा पर्यटक मोठ्या प्रमाणात आलेले दिसून येत होते. या आलेल्या पर्यटकांच्या आनंदावर हवामानाने अचानक विर्जन टाकले त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले. सोमवारी बोटी सुरु करण्यात आल्याने तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांना किल्ला पाहण्यासाठी सुरू केला आहे. या किल्ल्याच्या मागील बाजूस ब्रेक वॉटर बंधारा टाकून त्या ठिकाणी जेट्टी उभारण्यात आलेली आहे. ती लवकरात लवकर सुरू करावी जेणेकरून पर्यटकांना सुरक्षित किल्ला पाहता येईल अशी मागणी पर्यटकांमधून व स्थानिकांमधून जोर धरत आहे.
जंजिरा किल्ला तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांसाठी खुला
