कोट्यवधींची होणार उलाढाल
। पेण । वार्ताहर ।
चैत्र महिना सुरू झाला असून, गुढीपाडव्याच्या शुभमुहर्तानंतर सर्वत्र जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे. महाराष्ट्रात मानाची समजली जाणारी आगरी कोळी बांधवांची इष्टदेवता असणारी कार्ला येथील एकविरा देवीची जत्रा सुरू झाल्यानंतर स्थानिक ग्रामदेवतांच्या जत्रांना सुरूवात होत असते.
पेण तालुक्यातील जत्रोत्सवाची सुरूवात रविवारी (दि. 06) रामनवमीपासून होत आहे. तालुक्यातील वाशी, वढाव, गडब, बोरी, कळवा, रावे, दादर यांच्यासह अनेक ठिकाणच्या यात्रांना मोठी गर्दी उसळणार आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील जत्रांमध्ये पुन्हा तोच उत्साह पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने कोट्यवधींची उलाढाल होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच, यात्रांचा आनंद घेण्यासाठी परिसरातील नागरिक उत्सुक असून सध्या यात्रांची जोरदार तयारी करण्यात येत आहे.
लक्ष वेधून घेणारी देवकाठी
या यात्रांमध्ये देवकाठी लक्ष वेधून घेत असतात. उंचच उंच देवकाठया बनवण्यासाठी ग्रामस्थांमध्ये चढाओढ पहायला मिळत असते. उन्हाळयाची पर्वा न करता ग्रामस्थ देवकाठी मंदिराजवळ नेत असतात. तसेच, देवकाठया उभारताना एक वेगळाच आनंद नागरिकांमध्ये पाहावयास मिळतो.
तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा
वाशी येथील वरसूबाय जगदंबा भवानी देवीची यात्रा ही 11 एप्रिल रोजी भरत असून, ही तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा मानली जाते. आकाश पाळणे, इतर मनोरंजन करणारे खेळ तसेच मेवा मिठाईची दुकाने यांनी संपूर्ण परिसर गजबजलेला असतो. तर मुंबई, ठाणे परिसरातील चाकरमानी या यात्रेला आवर्जून हजर राहतात.
पेणमधील प्रसिध्द यात्रा
सोमवार 7 एप्रिल- दादरची यात्रा, गुरूवार 10 एप्रिल- वढाव येथील काळभैरव देवाची यात्रा, शुक्रवार 11 एप्रिल- वाशी येथील वरसूबाय जगदंबा भवानी देवीची यात्रा, शनिवार 12 एप्रिल- बोरी येथील आक्कादेवीची यात्रा, सोमवार 14 एप्रिल- वरेडी येथील काळभैरव देवाची यात्रा, शनिवार 27 एप्रिल- रावे गावची आई रायबादेवीची यात्रा, बुधवार 30 एप्रिल- जिते गावची सत्यनारायण देवाची यात्रा.