। श्रीवर्धन । समीर रिसबूड ।
तालुक्यातील गालसुरे ते महाड खाडी मार्गावरील जावेळे ते वडशेत वावे या गावांना जोडणारा पुल कोसळून दोन वर्ष पूर्ण होत आली. जावेळे पुलाच्या बाबतीत अंदाजित खर्च एक कोटी दहा लाख रुपये इतका आहे. यासाठी नाबार्ड कडून मंजुरी आणण्याचे प्रयत्न पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या कडून होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्यांकडून सांगण्यात येते.
गालसुरे, महाड खाडी मार्गे आंबेत, मंडणगड येथे जाण्यासाठी पर्यायी मार्ग असलेला रा.मा.99 मार्गावरील प्र.जि.मा.4 साखळी क्र.2/400 मधील जावेळे पुल दोन वर्ष कोसळलेल्या अवस्थेत असून पुलाच्या बाजुनी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. खाडीचे पात्र असलेल्या मार्गावर जेमतेम उंचीचा असलेला व दोन्ही बाजूंनी सिमेंटचे पाईप टाकून काँक्रिटीकरण करून तात्पुरता पर्यायी पुल पावसाळ्यात स्थानिकांना खरोखर फायदेशीर ठरणार आहे का? पावसाळ्यात पर्यायी पुलावरून पाणी जायला लागले की वडशेत वावे, आडी, धारवली या येथील स्थानिकांना तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त यायचे म्हणजे कोलमांडला, बागमांडला मार्गे श्रीवर्धन येथे यावे लागते. हा प्रवास त्रासदायक व खर्चिक आहे.
नाबार्ड योजनेंतर्गत रस्त्याचे काम प्रस्तावित केले आहे.अद्याप मंजुरी प्राप्त व्हायची आहे. मंजुरी मिळाल्यावर कामास सुरुवात होईल.
– प्रसन्नजीत राऊत.उपविभागीय अभियंता.