। अलिबाग । प्रतिनिधी ।
अयोध्येतील श्री राम मंदिरात सोमवार (दि.22) झालेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून कमळ पतसंस्थेने दिवसभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यादिवशी पतपेढीच्या समोरच असणार्या काशीविशेश्वर मंदिरात पूजा करून मंदिरासमोर श्रीरामाचे भव्य कटआऊटसह एका शामियानात लावून श्रीराम पूजन व त्यासमोर अक्षतांचे समर्पण कमळ पतसंस्थेचे सर्व संचालक व कर्मचारी तसेच नागरिकांकडून करण्यात आले. याठिकाणी कमळ पतसंस्थेचे सर्व कर्मचारी, सभासद, हितचिंतक व अनेक रामभक्तांनी दिवसभर पूजन केले.
याप्रसंगी पतसंस्थेकडून भाविकांना पेढा व सुंठवडा प्रसाद म्हणून देण्यात आला. संध्याकाळी अलिबाग तालुक्यातील किर्तनकार मयुरेश केळकर यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित केले होते. या किर्तनाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. अॅड. नीला तुळपुळे यांनी कारसेवेला गेल्या असताना अयोध्येजवळील उरई गावामध्ये वास्तव्याला असताना गायलेले गीत उपस्थितांना ऐकवले. कार्यक्रमाच्या पश्चात पतसंस्थेकडून परिसरामध्ये शेकडो दिपप्रज्ज्वलन करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे संचालक, पदाधिकारी, कर्मचारी यांनी भरपूर मेहनत घेतली.
कमळ पतसंस्थेतर्फे श्री रामाचा जयघोष..
