जनतेच्या प्रश्नांसाठी आग्रही भुमीकेने सर्वंच अचंबित
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सभागृहात कधीच गैरहजर न राहणार्या शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, लढाऊ बाण्याचे आमदार जयंत पाटील यांनी पायाला दुखापत असतानाही वॉकरच्या सहाय्याने विधान परिषदेच्या सभागृहात हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीने सर्वच सदस्य अचंबित झाले. त्यांच्याप्रती अनेकांनी यावेळी आदरभाव व्यक्त करीत त्यांच्या लढाऊ बाण्याला लाल सलाम केला.
आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. काही दिवसांपूर्वी पायाला दुखापत झाल्याने शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, राज्याच्या विधान परिषदेचे ज्येष्ठ सदस्य आमदार जयंत पाटील यांना सक्तीची विश्रांती देण्यात आली होती. मात्र या काळातही त्यांची अधिवेशनाची तयारी सुरूच होती.
राज्य विधिमंडळाचं अधिवेशन म्हणजे आपल्या मतदारसंघातील जिव्हाळ्याचे प्रश्न सरकारदरबारी मांडण्याची आयती संधीच! त्यात भाई जयंत पाटील यांच्या भाषणाचा व प्रश्नांचा वेगळा दबदबा सभागृहात नेहमीच पहायला मिळतो. जनतेचे विविध महत्त्वाचे प्रश्न ते रोखठोकपणे सभागृहात मांडत असतात व सडेतोडपणे सरकारला जाबही विचारत असतात. आज दुखरा पाय घेऊन, वॉकरच्या सहाय्याने चालत सभागृहात हजर राहण्याची त्यांनी आग्रही भूमिका घेतली व इतर सदस्यांना अचंबित केले.
जयंत पाटील यांच्या वागण्या-बोलण्यातला साधेपणा सर्वांना नेहमीच भावतो. मात्र जनतेच्या प्रश्नांप्रती त्यांची असलेली ओढ व ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांचा अखंड सुरू असलेला खटाटोप हा प्रेरणादायी आहे. त्यांच्याबद्दल जनतेच्या मनात प्रेम आहेच पण आजच्या त्यांच्या समर्पण भावनेतून केलेल्या कृतीमुळे त्यांच्याबद्दलचा आदरभावही द्विगुणीत झाल्याची भावना कार्यकर्ते व सर्वसामान्य माणसांच्या मनात आली आहे.