| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झोकून देऊन या निवडणूकीत काम केले आहे. त्यामुळे हा घवघवीत विजय प्राप्त झाला आहे. अलिबाग नगरपरिषदेमधील असलेला हा पॅटर्न शेवटपर्यंत ठेवायचा आहे. या निवडणूकीत काही विरोधकांची डिपॉझिट जप्त झाली आहेत. अलिबाग नगरपरिषदेवर गेल्या 40 वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे. ही परंपरा आजही कायम ठेवली आहे. अगदी कमी वयातील व उच्च शिक्षीत, अनेक भाषांवर प्रभूत्व असणाऱ्या अक्षया नाईकच्या रुपाने नगराध्यक्ष अलिबाग नगरपरिषदेला मिळाला आहे. सर्वाधिक मते घेण्याचा विक्रम अक्षया नाईक यांनी केला आहे असा गौरवोद्गार शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी काढत, नगरपरिषदेवर वर्चस्व एकीमुळे झाल्याचे ते म्हणाले.
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणूकीत यश संपादन केल्यावर अलिबागमधील शेकाप भवन येथे रविवारी (दि. 21) कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील बोलत होते. याप्रसंगी जयंत पाटील म्हणाले की, अलिबाग तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेसची मक्तेदारी होती. काँग्रेसने देशात चांगले काम केले आहे. ते काम पूसून टाकण्याचे काम भाजपचे सरकार करीत आहेत. मात्र देशात महाविकास आघाडी स्थापन झाली. शेकापसह काँग्रेस व अन्य पक्ष एकत्र आले. महाविकास आघाडीतून ही निवडणूक लढविण्यात आली आहे. या निवडणूकीत शेकापसह काँग्रेसने ही जिद्दीने काम केले आहे. उद्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत एकत्र काम करायचे आहे. त्यापध्दतीने प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
अलिबागचे कामकाज अधिक पारदर्शक व स्वच्छ होणार: ॲड. गौतम पाटील

अक्षया नाईक यांच्या रुपाने नगराध्यक्ष पदासाठी एक नवीन चेहरा अलिबागकरांना मिळाला आहे. उच्च शिक्षित तसेच राजकीय वारसा असलेली अक्षया नाईक हीने कमी वयात नगराध्यक्ष होण्याचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. 22 वर्षाची नगराध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात तिने एक वेगळे नाव निर्माण केले आहे. प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली अलिबागमध्ये एक वेगळे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अक्षया नाईक यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग शहरातील कामकाज पारदर्शक व स्वच्छ होईल अशी अपेक्षा आहे. साक्षी पाटील व आनंद पाटील यांनादेखील चांगली मते देऊन त्यांना निवडून दिले आहेत. त्यामुळे अलिबागकरांचे मनापासून आभार व्यक्त केले जात आहे, असे प्रतिपादन शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील यांनी केले.
अलिबागच्या विकासासाठी कटीबध्द: चित्रलेखा पाटील

शेतकरी कामगार पक्षाची सत्ता अलिबाग नगरपरिषदेवर कायम राहिली आहे. अलिबागकरांनी भरघोस मतांनी उमेदवारांनी निवडून दिले आहे. अलिबागची शान व मान राखण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे या विजयाचे श्रेय संपुर्ण अलिबागकरांना दिले जात आहे. काही उमेदवारांना पराभव स्विकारावा लागला. परंतु बचेंगे तो और लढेंगे या भुमिकेतून पुन्हा काम करायचे आहे. शेकापचे नेते जयंत पाटील हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. प्रशांत नाईक यांनी आपल्या कामातून अलिबागकरांची मने जिंकली आहेत. त्यांची मुलगी अक्षया नाईक या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. आपल्या आई, वडीलांप्रमाणे अलिबागच्या विकासासाठी पाच वर्षात स्वतःला झोकून देईल असा विश्वास आहे. त्यामुळे शेकाप अलिबागच्या विकासासाठी कटीबध्द असल्याचा विश्वास चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.
अलिबागकरांच्या प्रेमामुळे विजय: अक्षया नाईक

अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसच्या उमेदवारांना जनतेने निवडून दिले आहे. अलिबागकरांच्या प्रेमामुळे हा विजय मिळाला आहे. त्यांच्या प्रेमामुळे नगराध्यक्ष म्हणून उभी आहे. त्याचे सर्व श्रेय अलिबागकरांना जात आहे. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा जनतेमुळेच पुन्हा नगरपरिषदेवर फडकला आहे. असेच प्रेम कायम ठेवा, अलिबागच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील राहणार असा विश्वास नवनिर्वाचित नगराध्यक्ष अक्षया नाईक यांनी व्यक्त केला.







