यमराजाच्या प्रतिकृतीतून प्रवाशांना सुरक्षिततेचा संदेश
। खांदेश्वर । प्रतिनिधी ।
रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी पनवेल रेल्वे पोलिसांनी खांदेश्वर रेल्वे स्थानकावर ‘जीवन रक्षा अभियान’ राबविले. यावेळी यमराजाची प्रतिकृती उभी करून प्रवाशांना सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला. पोलिसांनी मानवी साखळी तयार करून प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडू नका, नियमांचे पालन करा आणि स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, असे आवाहन केले.
खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक आणि दोनच्या पनवेल दिशेकडील टोकाला रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करण्याचे प्रकार घडत असल्याने अपघातांचा धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस आयुक्त विमल बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला होमगार्ड आणि रेल्वे सुरक्षा दलाचे प्रतिनिधी या मोहिमेत सहभागी झाले होते.
मात्र, खांदेश्वर स्थानक परिसरातील परिस्थितीचा विचार करता केवळ जनजागृती पुरेशी ठरणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. स्थानकाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर इमारतींची बांधकामे सुरू आहेत. या ठिकाणी कामासाठी येणारे कामगार तसेच परिसरात राहणारे नागरिक दररोज रेल्वेने प्रवास करण्यासाठी स्थानकात येतात. काही प्रवासी वेळ वाचविण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा धोकादायक मार्ग निवडत असल्याचे दिसते.
भुयारी मार्ग खुला करण्याची मागणी
स्थानकाचा भुयारी मार्ग एका बाजूने बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याची भावना असल्यामुळे काही जण रेल्वे रूळ ओलांडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित भुयारी मार्ग खुला करून प्रवाशांसाठी सुरक्षित ये-जा करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
रेल्वे पोलिसांनी जनजागृतीसोबतच रेल्वे प्रशासनानेही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरांनी पुढाकार घेऊन संबंधित विभागाशी समन्वय साधावा आणि भुयारी मार्गाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
नियम पाळा, सुरक्षित राहा! रेल्वे प्रवासात अडचण आल्यास जीआरपी हेल्पलाइन क्रमांक 1512 वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. जनजागृतीसोबतच सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यास रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
