टी.एस.पी.योजनेअंतर्गत कोट्यवधींचा खर्च; आजारांची माहिती देणारे फलक भिंतीवर
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील जिते गावाच्या बाहेर महाराष्ट्र शासनाच्या रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत टी.एस.पी. योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधण्यात आले आहे. मात्र, प्रशासकीय अनास्थेमुळे या इमारतीची दयनीय स्थिती झाली असून, कोट्यवधींचा खर्च करूनही हे प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या पूर्णपणे बंद स्थितीत आहे. दरम्यान येथे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेविकांची नियुक्ती शासनाने केलेल्या नाहीत आणि त्यामुळे उपकेंद्र तीन वर्षांपासून बंद स्थितीत आहे.
नेरळ प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या जिते येथील उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम आदिवासी उपयोजना यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. इमारतीचे बांधकाम जून 2021 मध्ये सुरू झाले होते आणि मार्च 2023 मध्ये ते पूर्ण झाले. यासाठी सुमारे 2 कोटी 32 लाख रुपयांची भव्य अंदाजपत्रकीय रक्कम खर्च करण्यात आली आहे. रोशन कन्स्ट्रक्शन मार्फत हे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, इतकी मोठी रक्कम खर्च करूनही आज या आरोग्य केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराला कायमचे टाळे लागलेले पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आरोग्यविषयक जनजागृती करणारे आणि विविध आजारांची माहिती देणारे मोठे फलक भिंतीवर दिमाखात लावण्यात आलेले आहेत. परंतु, प्रत्यक्षात मात्र येथील आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला पाहायला मिळत आहे. इमारतीची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली असून, सभोवताली चारी बाजूंनी वाळलेल्या गवताने आणि झाडीझुडपांनी वेढा घातला आहे. सद्यस्थिती पाहता, येथे रुग्णांवर उपचाराची आवश्यकता नसून, या रुग्णालयावरच उपचार करण्याची वेळ आली आहे असे विदारक चित्र दिसत आहे.
या गंभीर समस्येबाबत आरोग्य विभागाकडे विचारणा केली असता, पुरेसा स्टा उपलब्ध नसल्यामुळे नेरळ येथील आरोग्य कर्मचारी या रुग्णालयाला वेळोवेळी भेट देत असतात, असे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, रुग्णालयाची सध्याची कुलूपबंद स्थिती पाहता, येथे कोणताही डॉक्टर, आरोग्य सेवक अथवा अधिकारी फिरकत नसल्याचे उघड झाले आहे. केवळ कागदोपत्री घोडे नाचवून नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकली जात आहे. घराशेजारीच सर्व सुविधायुक्त शासकीय रुग्णालय उभे असूनही नागरिकांना त्याचा कोणताही उपभोग घेता येत नाही. ह्या उपकेंद्रामध्ये लवकरात लवकर पूर्णवेळ डॉक्टर आणि कर्मचारी नियुक्त करून रुग्णसेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता यावर संबंधित वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जिते उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून इमारती उभी आहे. मात्र, शासनाने येथील नियुक्त्या केल्या नसल्याने रुग्णानाची गैरसोय टाळण्यासाठी नेरळ जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या सदस्या सुनीता मोरे यांच्या सूचनेनुसार तात्पुरत्या स्वरूपात पिंपळोली उपकेंद्राच्या आरोग्यसेविका यांना जिते येथे उपकेंद्राचे जबाबदारी दिली आहे.
डॉ. नितीन गुरव
तालुका आरोग्य अधिकारी






