विद्यार्थ्यांना मिळणार प्राथमिक लष्करी प्रशिक्षण; देशभक्ती, शिस्त आणि स्वसंरक्षणाचे धडे
| माणगाव | प्रतिनिधी |
राष्ट्रसेवेची प्रेरणा, शिस्तबद्ध जीवनशैली आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व घडविण्याच्या उद्देशाने माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुधाकर नारायण शिपुरकर आणि गणेश यशवंत वाघरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेने एक अभिनव आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक सैनिक प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असून या निर्णयाचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून उत्स्फूर्त स्वागत होत आहे.
जिल्ह्यात शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत शिक्षणासोबत राष्ट्रप्रेम आणि चारित्र्यनिर्मितीचा संस्कार देण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणारा ठरणार आहे.
या प्रशिक्षणासाठी सातारा येथील कमांडो ट्रेनिंग फोर्समधील निवृत्त लष्करी अधिकारी, अनुभवी एनसीसी कॅडेट्स तसेच क्रीडा प्रशिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तिरंदाजी, रायफल शूटिंग, तलवारबाजी, योगा, लाठी-काठी, रोप आणि पोल मल्लखांब, ड्रिल, कमांडो पी.टी., स्वसंरक्षण, ट्रेकिंग आणि विविध साहसी उपक्रमांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक ताकद, नेतृत्वगुण, संकटांचा सामना करण्याची क्षमता आणि राष्ट्राप्रती कर्तव्यभावना निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. लहान वयातच सैनिक प्रशिक्षणाची ओळख झाल्याने विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित होईल आणि ते भविष्यात आदर्श, जबाबदार व कर्तव्यनिष्ठ नागरिक म्हणून घडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या प्रशिक्षणाचा लाभ भविष्यात सैन्यदल, पोलीस दल, एनसीसी तसेच विविध सुरक्षा दलांच्या भरतीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना होणार आहे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.
राष्ट्रसेवेचे स्वप्न रुजविणार
विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रसेवेचे स्वप्न रुजविणारा आणि देश प्रथम ही भावना जागविणारा हा उपक्रम माणगावच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी एक नवा आदर्श निर्माण करणारा ठरणार असल्याची भावना पालकांमधून व्यक्त होत आहे.





