जेएनपीएने तालुक्यात सीसीटीव्हीची गरज भागवावी

तालुका मराठी पत्रकार संघाची मुख्य प्रबंधकांकडे मागणी

| उरण | वार्ताहर |

जेएनपीए बंदर आणि त्यावर आधारित उरण तालुक्यात निर्माण झालेल्या शेकडो प्रकल्पांच्या माध्यमातून उरण तालुक्यातील लोकवर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढत्या वर्दळीचा ताण हा पोलीस यंत्रणेवरही पडू लागला आहे. अशातच होणाऱ्या अप्रिय घटनांचा तपास लावण्याकामी पोलिसांनादेखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर जेएनपीए बंदराने तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने जेएनपीए बंदराच्या मुख्य प्रबंधक मनीषा जाधव यांची भेट घेऊन केली आहे.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर आणि सरचिटणीस अजित पाटील उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेतून मनीषा जाधव यांनीदेखील आपण या कामात पुढाकार घेऊन सीएस फंडातून जेएनपीए विभागात तरी असे कॅमेरे लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन पत्रकार संघाला दिले आहे. सुरुवातीला मुख्य प्रबंधकपदी मनीषा जाधव यांची नियुक्ती झाल्याबद्दल उरण तालुका मराठी पत्रकार संघातर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Exit mobile version