जो रुटने ब्रायन लाराला मागे टाकले

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जो रूटने मोठा पराक्रम केला. त्याने शनिवारी एजबॅस्टन स्टेडियमवर वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम मोडला. कसोटी इतिहासात सर्वाधिक धावा करणार्‍या खेळाडूंच्या यादीत रूट सातव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या खात्यात 261 कसोटी डावात 12,027 धावा आहेत. लाराने आपल्या कारकिर्दीत 232 डावात 11,953 धावा केल्या. तो आठव्या स्थानावर घसरला आहे. रूटने दुसर्‍या कसोटीत वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू शिवनारायण चंद्रपॉल (11,867) याला मागे टाकले होते. मनजो रूटने डिसेंबर 2012 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 143 कसोटींमध्ये 32 शतके आणि 63 अर्धशतके केली आहेत. तिसर्‍या कसोटीत त्याने अर्धशतक झळकावले तो 87 धावा काढून बाद झाला. गेल्या सामन्यात त्याने शतक झळकावले होते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावा केल्या.

सचिनने 51 शतके आणि 68 अर्धशतके झळकावली, जी सर्वाधिक आहेत. या यादीत दुसर्‍या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे, ज्याने 168 कसोटीत 13,378 धावा केल्या आहेत. त्याने 41 शतके आणि 62 अर्धशतके केली. दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने 166 सामन्यांमध्ये 13,289 धावा जोडल्या. त्याने 45 शतके आणि 58 अर्धशतके केली. भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविड चौथ्या स्थानावर आहे. द्रविडने 164 कसोटीत 13,288 धावा केल्या. इंग्लंडचा माजी खेळाडू अ‍ॅलिस्टर कुक 161 कसोटीत 12,472 धावा केल्या. तो पाचव्या स्थानावर आहे. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज तिसर्‍या कसोटीबद्दल बोलायचे तर, क्रेग ब्रॅथवेट ब्रिगेडने पहिल्या डावात 282 धावा केल्या. यजमान इंग्लंडची पहिल्या डावात सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर बेन डकेटला केवळ तीन धावा करता आल्या. जॅक क्रॉलीने 18 आणि ऑली पोपने 10 धावा केल्या. मार्क वुडचे खाते उघडले नाही.

Exit mobile version