क्यूआर कोडसह विविध सुविधांचा शुभारंभ
| नागोठणे | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सहकारी पतसंस्थांमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटविणाऱ्या व बँकांप्रमाणेच सोयी-सुविधा देणाऱ्या नागोठण्यातील नावाजलेल्या श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्थेने क्यूआर कोडसह विविध सुविधा सुरू करुन डिजिटल प्रणालीमध्ये हायटेक होऊन आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरेपेचात रोवला आहे. श्री. जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर जैन यांच्या हस्ते पतसंस्थेच्या क्यूआर कोडसह विविध सुविधांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी संस्थेचे किशोर जैन यांच्यासह सचिव संजय काकडे, संचालक रितेष दोशी व व्यवस्थापक सुनिल नावले उपस्थित होते.
राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे यशस्वी वाटचाल सुरु असलेल्या नागोठण्यातील श्री जोगेश्वरी मर्चंट पतसंस्थेबद्दल पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना किशोर जैन यांनी सांगितले की, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या आमच्या पतसंस्थेमध्ये पूर्वीपासूनच असलेल्या विविध बचत, कायम ठेव, विविध कर्जपुरवठा, लॉकर्स सुविधा, वीज बील भरणा व इतर सुविधांसह आता आरटीजीएस, एनईएफटी व क्यूआर कोड सुविधा ग्राहकांच्या सेवेसाठी सुरु करीत आहोत. पतसंस्थेमधील या सर्व सुविधांचा लाभ नागोठणे शहरासह विभागातील नागरिक, व्यापारी वर्ग व खातेदारांनी घ्यावा.
सचिव संजय काकडे यांनी सांगितले की, पतसंस्थेच्या सभासद व सर्व ग्राहकांसाठी एसएमएस बँकिंग, पैसे ट्रान्सफर कारण्याकरिता आरटीजीएस/एनईएफटी, क्यूआर कोड व मोबाईल बँकिंग सुविधा चालू करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अध्यक्ष किशोरभाई जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेने यशाची उंच भरारी घेतली असल्यानेच यावर्षी पतसंस्थेला 20 लाख 69 हजार 370 रुपये एवढा नफा झाल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान पतसंस्थेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 24 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहितीही संजय काकडे यांनी यावेळी दिली.