कडावमधील घटना; आमदाराचा नातेवाईक सांगत पत्रकाराला धमकी

एसटी थांबा बळकवणाऱ्याच्या उलट्या बोंबा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील कडाव या गावामधील बाजारपेठेत एसटी प्रवासी थांबा आहे. अनेक वर्षे तेथे असलेल्या प्रवासी निवारा शेडमध्ये प्रवासी एसटीची वाट पाहात असायचे. मात्र, कडाव गावातील एका व्यक्तीने ही प्रवासी निवारा शेड बळकावली असून, त्या ठिकाणी आपले दुकान थाटले आहे. दरम्यान, त्या प्रवासी निवारा शेडबद्दल पत्रकारांनी दखल घेतली असता त्या एसटी थांबा बळकवणाऱ्या व्यक्तीकडून ‌‘कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे आमचे नातेवाईक आहेत. तू इकडे येऊन दाखव‌’, अशा धमक्या दिल्या गेल्या. त्यामुळे प्रवासीवर्गासह पत्रकार संघटना आक्रमक झाली आहे.

कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील कडाव गावात पूर्वी एसटी गाड्यांशिवाय कोणत्याही प्रकारची वाहतूक व्यवस्था नव्हती. त्यामुळे प्रवासीवर्गाला एसटीची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यासाठी एसटी महामंडळाकडून एसटी बसच्या मार्गावर एसटी थांबे बनविण्यात आले होते. तसाच एसटी थांबा आणि प्रवासी निवारा शेड कडाव गावातदेखील बांधण्यात आली होती. 1977-78 मध्ये एसटी महामंडळाने पक्के बांधकाम केलेला प्रवासी थांबा बनविला होता. परंतु, आता त्या एसटी निवारा थांब्याचा अनधिकृत ताबा कडाव गावातील काही लोकांनी घेतला आहे. विनोद काशिनाथ पवाळी, रमेश मारुती पवाळी आणि उमेश यशवंत ऐनकर या तिघांनी संगनमताने त्या शासकीय एसटी थांब्यावर अनधिकृत दुकानगाळे उभारले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध, रुग्ण, प्रवासी नागरिक आणि पर्यटकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

त्याबाबतची तक्रार, पुरावे आणि शासकीय कागदपत्रे कर्जत एसटी विभाग व कडाव ग्रामपंचायतीमध्ये दाखल करण्यात आले आहेत. मात्र, असे असतानाही त्यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. याउलट, ग्रामपंचायतीने परवानगी न देता झालेल्या या बांधकामांना घरपट्टीदेखील आकारली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनासह स्थानिक नेत्यांचे या बेकायदेशीर कृत्याला छुपे समर्थन तर नाही ना, असा प्रश्न जोर धरत आहे.

पत्रकार संघटना आक्रमक
कडाव गावातील शासकीय एसटी प्रवासी थांबा बळकावून अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विनोद काशिनाथ पवाळी या गावगुंडाने ‌‘आमदार महेंद्र थोरवे माझे नातेवाईक लागतात. त्यामुळे आमचे कोणीच वाकडे करू शकत नाही. गावात येऊन दाखव मग दाखवतो‌’, अशी धमकी एका पत्रकाराला समाज माध्यमांवर दिली आहे. त्यामुळे पत्रकार संघटना आक्रमक झाल्या असून, पत्रकारांच्या अधिकारावर घाला घालणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी, तसेच याप्रकरणी आमदारांचे नाव घेऊन पत्रकारांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला जाब विचारावा, अशी मागणी कर्जत प्रेस असोसिएशन संघटनेने केली आहे.
Exit mobile version