| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या सहा महिन्यांत सहा सर्वसाधारण सभा होण्याऐवजी दुसरी सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. तसेच, सकाळी सव्वाअकरा वाजता सुरु झालेली सर्वसाधारण सभा सायंकाळचे 7.00 वाजले तरी सुरूच होती. या सभेपुढे 38 विषय ठेवण्यात आले होते आणि त्या सभेमध्ये होणारी वादळी चर्चा लक्षात घेऊन मुख्याधिकारी यांच्याकडून प्रसार माध्यमांना बसण्यास हरकत घेण्यात आली. दरम्यान, नगरपरिषदेला पत्रकारांचे वावडे असल्याचे आणि आपले कारनामे माध्यमांमधून बाहेर येऊ नये म्हणून पत्रकारांना सभेला बसू दिले नाही, असे स्थानिक पत्रकारांमधून बोलले जात आहे.
माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर महिन्यात झाली. त्यानंतर दर महिन्याला एक याप्रमाणे सहा सर्वसाधारण सभा होणे अपेक्षित होते. मात्र, नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडलेली सर्वसाधारण सभा नवीन सदस्य मंडळाची दुसरीच सर्वसाधारण सभा आहे. या सर्वसाधारण सभेच्या अजेंडा मध्ये एकूण 38 विषय ठेवण्यात आले आणि त्या विषयांवर होणारी चर्चा लांबली. सव्वाअकरा वाजता सुरु झालेल्या सभेची सुरुवात मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून झाली. मात्र, ते इतिवृत्त वाचन केले जात असताना बहुसंख्य सदस्यांनी आक्षेप घेतल्याने अजेंडा वरील पहिलाच विषय सुरु होण्यास दुपार संपली होती. हि सभा शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची असल्याने माथेरान आणि कर्जत तालुक्यातील पत्रकार हे सकाळी साडेदहा वाजता परिषदेच्या कार्यालयाबाहेर जमले होते. मात्र, प्रत्यक्ष सभा सुरु होत असताना वाहिन्या आणि वृतपत्रांच्या प्रतिनिधींना संकलन करून देण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांनी आपला निषेध नोंदवला असून, मुख्याधिकाऱ्यांच्या कृती बद्दल जिल्हा माहिती अधिकारी यांना कळवले. दरम्यान, माथेरान पालिकेमध्ये रात्री 8.00 वाजले तरी सर्वसाधारण सभा सुरु असल्याने पालिकेच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.







