रस्ता, मच्छिमारांचे प्रश्‍न जेएसडब्ल्यूने सोडवावेत – पंडित पाटील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग-वडखळ रस्ता, प्रदुषण, प्रकल्पग्रस्त आणि बाधित मच्छिमारांना नोकरीत प्राधान्य आदी विविध समस्या सोडविण्यासाठी जे.एस.डब्ल्यू कंपनी व्यवस्थापनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना माजी आ.पंडित पाटील यांनी केली आहे.

या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि.24) को.ए.सो. ना.ना.पाटील हायस्कूल पोयनाड, पेझारी येथे जे.एस.डब्ल्यू कंपनीशी निगडित असलेल्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी पंडित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा संपन्न झाली.

यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, युवानेते सवाई पाटील, कंपनीचे अधिकारी नारायण बोलबुंडा, पंचायत समिती माजी सभापती प्रमोद ठाकूर, जीवन गावंड, अलिबाग नायब तहसीलदार तसेच जे.एस.डब्ल्यू कंपनीचे अधिकारी व सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत गेली अनेक वर्षे रखडलेल्या अलिबाग-वडखळ रस्त्याची दुरावस्था जेएसडब्ल्यूच्या अवजड वाहतूकीमुळे झाली असल्याने त्याची जबाबदारी कंपनीचीच असल्याचा पुनरुच्चार पाटील यांनी केला. प्रकल्पग्रस्त आणि बाधित मच्छिमारांना नोकरीत प्राधान्य देण्याची मागणी देखील पुन्हा लावून धरली. आपल्या विविध मागण्यांसाठी शेकापतर्फे 25 ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र पावसाळी अधिवशेन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या विनंतीनुसार आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे पंडीत पाटील यांनी सांगितले.

पंडित पाटील यांनी यापूर्वी अलिबाग वडखळ रस्त्याचे चौपदरीकरण तसेच जे.एस.डब्ल्यू कंपनीच्या समस्यांवर आवाज उठवल्यानंतर या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात या बैठकीचे आयोजन केले होते. तसेच वडखळ ते धरमतर या अरुंद रस्त्याच्या बाजूला बेकायदा भराव टाकून रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत वाहन पार्किंग केली जात असल्याबाबतची बाब निदर्शसान आणून दिली.

तसेच जे.एस.डब्ल्यू कंपनीच्या प्रदूषणाचा त्रास होत असल्याने जनतेसोबतच जलप्रदुषणामुळे मासळीवर देखील परिणाम झाल्याने मच्छिमारांचेही नुकसान झाले असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या बरोबरीनेच मच्छिमार समाजाला देखील जे.एस.डब्ल्यू कंपनीने नोकरीत प्राधान्य द्यावे. कंपनीच्या सी.एस.आर फंडातून करण्यात येणार्‍या कामांची माहिती संबंधीत ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींना देणे. नोकरी प्रक्रीया राबविताना जाहिरात देण्यात आली पाहिजे. प्रकल्पबाधितांना आरक्षण देण्यात यावे. जे.एस.डब्ल्यूचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने अलिबाग तालुक्यात राहतात. त्यामुळे कचरा निर्मुलनाची मोठी समस्या निर्माण होते. त्याचा ताण संबंधीत यंत्रणेवर येत असल्याने त्यासाठी देखील कंपनीने योगदान देण्याची सूचना यावेळी पंडित पाटील यांनी केली.

Exit mobile version