दुसऱ्या पोक्सो अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला 1 दिवसीय पोलीस कोठडी
। रोहा । वार्ताहर ।
माणुसकी आणि नात्याला काळिमा फासणाऱ्या व संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या रोहे तालुक्यातील वरसे गावातील ‘त्या’ अप्रिय आणि तितकीच निंदनीय असलेल्या घटनेतील तिन्ही आरोपींना रोहा न्यायालयासमोर सोमवारी सायंकाळी उशिरा हजर केले असता तिघांनाही रोहा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. तर या घटनेतील मुख्य आरोपी तेजस पडवळ याने आणखी एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने त्याच्या विरोधात आणखी एक पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात मात्र आरोपी तेजस पडवळ याला न्यायालयाने 1 दिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे.
वासनेने पछाडलेल्या आरोपी तेजस पडवळ याने शेजारी राहणाऱ्या आपल्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलीला आपल्या घरात बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक प्रकार 30 डिसेंबर 2024 रोजी घडला. त्यानंतर सदरचा प्रकार घरी कोणाला सांगितलास तर आई आणि तुला मारून टाकेन अशी धमकी दिली. या घटनेची माहिती समजताच पीडित मुलीला घेऊन तीचे पालक आणि नात्यातील अन्य मंडळी चार चाकी गाडीतून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना तीन भावांनी संगणमत करून गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर पीडित मुलगी आणि तीचे नातेवाईक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी सहकार्याची भूमिका न घेतल्याने या घटनेचे वृत्त गावात वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. नंतर आरोपी तेजस गणेश पडवळ, अनुप गणेश पडवळ व दैनिक गणेश पडवळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 13 जानेवारीपर्यंत 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी (दि. 13) सायंकाळी त्यांना पुन्हा एकदा न्यायालया समोर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र त्याच गावातील दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्यानंतर लंपट तेजसच्या विरोधात दुसरा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने या प्रकरणात त्याला एक दिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान आरोपीचे एक एक करून अनेक कारनामे बाहेर पडल्यानंतर त्याच्या विरोधात एका आठवड्यात आणखी 3 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात एक पोक्सो अंतर्गत तर दोन गुन्हे विनयभंग केल्याचे आहेत. सद्यस्थित वरसे गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.