| बीड | प्रतिनिधी |
संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराडवर हत्या प्रकरणाचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर मोक्काही लावण्यात आला आहे. खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मीक कराडला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी केज सत्र न्यायालयात त्याच्या पोलीस कोठडीवर सुनावणी झाली. या सुनावणीत सीआयडीने पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, त्याचा ताबा एसआयटी घेण्याची शक्यता आहे. वाल्मीक कराडवर मोक्का लावल्याने आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी सीआयीडने वाल्मीक कराडला याप्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक केली होती. तसेच त्याला पोलीस कोठडी सुनावली होती.