बंब पाठविण्यापेक्षा कार्यवाही करा; जनार्दन पार्टे यांचे आवाहन
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान या पर्यटनस्थळी रस्त्यांवर क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यात आले आहेत. ते पेव्हर ब्लॉक आणण्यासाठी वापरलेल्या सिमेंट पिशव्या आजही जंगलात अनेक ठिकाणी पडून आहेत. त्या पिशव्यांना कोणी आग लावण्याआधी आणि आग लावल्यानंतर आग विझविण्यासाठी बंब पाठवण्याची वेळ येऊ नये यासाठी पालिका प्रशासनानेे काळजी घ्यावी असे आवाहन माथेरानमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पार्टे यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी माथेरान शहरातील आर्टिस्ट पॉईंट भागात दोन वर्षे पडून असलेल्या सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या यांना अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आलेल्या आगीमध्ये आजुबाजूच्या वनराईचे नुकसान झाले होते. त्यानंतर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांनी शहरातील वेगवेगळ्या भागात ठेकेदाराने पेव्हर ब्लॉक आणलेल्या सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या उचलून घेण्याची मागणी केली होती. त्याचवेळी वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणणार्या माथेरान शहरात असलेल्या वनराईचे नुकसान करणार्या प्लास्टिकबाबत पालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. त्याचे कारण मागील दोन अडीच वर्षात शहरातील रस्त्यांच्या क्ले पेव्हर ब्लॉकचे कामासाठी आणलेल्या सिमेंटच्या रिकाम्या झालेल्या पिशव्या आजही जंगलात भागात तशाच पडून आहेत. त्या पिशव्या ठेकेदाराने उचलून नेण्याची अट रस्त्याचे कामाचे ठेक्यामध्ये असतानादेखील पालिका प्रशासन ठेकेदारांना आडकाठी करीत नसल्याने ठेकेदर कंपन्या आपली कामे उरकून पळाले आहेत.
त्याचा परिणाम शहरातील विविध भागात आणि जंगलात पडून राहिलेल्या सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या पालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन जंगलात अस्ताव्यस्त पडलेल्या पिशव्या उचलण्याची मागणी माथेरान शहरातील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पार्टे यांनी केली आहे. त्यात संबंधित प्लास्टिक आणि सिमेंटच्या ज्या ठेकेदारांनी आणल्या आणि रिकाम्या पिशव्या परत नेल्या नाहीत. अशा ठेकेदारांनी रिकाम्या पिशव्या उचलून नेण्याची सूचना पालिकेने करावी आणि जर ते ठेकेदार रिकाम्या सिमेंटच्या पिशव्या उचलणार नसतील तर मात्र त्यांच्यावर कारवाईची बडगा उचलावा अशी मागणीदेखील जनार्दन पार्टे यांनी केली आहे.जंगलात पडलेल्या कचर्यामुळे वनराई जळणार असले तर आग लागू नये, यासाठी आधीच पालिकेने शहरातील प्लास्टिक पिशव्यांचे ढीग उचलावे अशी मागणी जोर धरत आहे.