देशात न्याय व्यवस्था सक्षम हवी- छाबला

महाड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन

| महाड | प्रतिनिधी |

देशाच्या सर्व भागात न्याय व्यवस्था सक्षम असायला हवी, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रियाझ छाबला यांनी शनिवारी महाड येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. तर, न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांनी वकिलांनी फळाची अपेक्षा न करता न्यायदानाचे काम करावे, असा सल्ला उपस्थित वकिलांना यावेळी दिला. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी रायगड जिल्हा व सत्र न्यायालयाचे रायगड अलिबागचे न्यायाधीश अजेय राजंदेकर, महाड येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे न्यायमूर्ती ॲड. प्रवीण उन्हाळे, महाड वकील संघाचे अध्यक्ष ॲड. संजय भिसे आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात न्या. छाबला यांनी देशाच्या सर्व भागात न्याय व्यवस्था सक्षम असायला हवी, त्यासाठी न्याय व्यवस्था सक्षम करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळेस बार वकील आणि न्यायाधीश यांच्यामध्ये समन्वयाने काम करण्याची मानसिकता निर्माण व्हायला हवी, असेही ते म्हणाले. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची असल्याचा गौरवही त्यांनी आपल्या भाषणात केला.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व रायगडचे पालक न्यायाधीश मिलिंद साठ्ये यांनी महाड येथे दिवाणी न्यायालय सुरु करण्यासाठी महाड वकील संघाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. भगवद्‌‍ गीतेतील एका श्लोकाचा आधार घेत फळाची अपेक्षा न करता काम करत राहा, असा सल्ला त्यांनी उपस्थित वकिलांना दिला. वकिलांनी आपल्या अशिलाप्रती संवेदनशील राहून त्याला योग्य ते मार्गदर्शन करण्याचे आवाहन त्यांनी केले. सुरुवातीस आपल्या स्वागतपर भाषणात ॲड. संजय भिसे यांनी महाड पोलादपूरसारख्या दुर्गम तालुक्यातील जनतेला न्याय मिळण्यासाठी अलिबाग या ठिकाणी ये-जा करावी लागू नये यासाठी महाड येथे कायमस्वरूपी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची मागणी केली होती. ती मान्य झाल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे आभार व्यक्त केले.

महाड येथील न्यायालयाची इमारत 185 वर्षांपूर्वीची ऐतिहासिक असून, या ऐतिहासिक न्यायालयासाठी असणारी जागा कमी पडत असल्याने शासनाने महामार्गाशेजारी दिलेल्या दीड एकर जागेत कोल्हापूरच्या धर्तीवर ऐतिहासिक अशी बहुमजली महाड न्यायालयाची इमारत उभारण्यात यावी, अशी मागणी ॲड. भिसे यांनी केली. अलिबाग येथील मुख्य न्यायालयाचे न्यायाधीश अजय राजंदेकर यांनी अलिबाग येथे पोलादपूरसारख्या जिल्ह्याच्या एका टोकाहून न्यायासाठी येणे खर्चिक व अडचणीचे ठरत होते. त्यामुळे न्यायदानाचा वेगही मंदावत होता. न्यायाचा वेग वाढवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी अशी न्यायालये होणे गरजेचे असल्याचे सांगितले. शेवटी महाड दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश प्रवीण उन्हाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. संदीप सर्कले व ॲड. सोनाली जवलेकर यांनी केले.

Exit mobile version