ज्युलियन ठरली सर्वात वेगवान

। पॅरिस । वृत्तसंस्था ।

विश्‍व विजेतेपदानंतर आपल्या पहिल्याच ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे शा कारीचे स्वप्न यावेळी भंगले आहे. महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत सातव्या लेनमध्ये असलेल्या विश्‍वविजेत्या अमेरिकेच्या शा कारी रिचर्डसनवर सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, 10.72 सेकंदात शर्यत संपली त्या वेळी कॅरेबियन बेटावरील सेंट ल्युशियाची ज्युलियन अल्फ्रेड ही नवीन विजेती म्हणून उदयास आली. तसेच, महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकण्याचा अमेरिकन धावपटूंचा दुष्काळ आणखी चार वर्षे वाढला आहे.

विश्‍व इनडोअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 60 मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकणार्‍या 23 वर्षीय ज्युलियनने सहाव्या लेगमधून धावताना उपांत्य फेरीप्रमाणे अंतिम फेरीतही वेगवान प्रारंभ केला. उपांत्य फेरीप्रमाणे अंतिम फेरीतही शा कारीचा प्रारंभ संथ होता. शेवटच्या 30 मीटरमध्ये शा कारीने वेग वाढविला होता. मात्र तोपर्यंत अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात शिक्षण घेत असलेली ज्युलियन एक मीटरपुढे निघून गेली होती. अखेर तिने 10.72 सेकंदाच्या आपल्या राष्ट्रीय विक्रमासह दिमाखात अंतिम रेषा पार केली आणि आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. ती आता 200 मीटर शर्यतीत सहभागी होणार आहे.

Exit mobile version