| चिरनेर | वार्ताहर |
येत्या 25 सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमासंदर्भात पूर्वतयारीच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी शुक्रवार, दि. 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता चिरनेर ग्रामपंचायत कार्यालयात, ग्रामस्थ व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. चिरनेर ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री. मिंडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक पार पडली.
भावी पिढीला आदर्श ठरणाऱ्या शूरवीरांच्या शौर्याचा इतिहास सांगणाऱ्या चिरनेर या ऐतिहासिक भूमीत 25 सप्टेंबर रोजी चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 93 वा हुतात्मा स्मृतिदिन साजरा होणार आहे. 25 सप्टेंबर 1930 साली इंग्रजी सत्तेला हादरवून टाकणाऱ्या या स्वातंत्र्यलढ्यात झालेल्या गोळीबारात आठ हुतात्म्यांसह 13 जण शहीद झाले. या देशभक्तांना दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी शासकीय मानवंदना देऊन अभिवादन करण्यात येते.
या बैठकीस ग्रामविकास अधिकारी महेश पवार, पोलीस पाटील संजय पाटील, शेकापचे चिटणीस सुरेश पाटील, चिरनेर गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, माजी सरपंच संतोष चिर्लेकर, कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील, निवृत्त अधिकारी श्रीधर मोकल, जयेश खारपाटील, अनंत नारंगीकर, विजय म्हात्रे, हिराजी ठाकूर, संताजी ठाकूर, सुनील ठाकूर आदी उपस्थित होते.