| पनवेल | वार्ताहर |
शैक्षणिक अथवा पर्यटन व्हिसावर भारतात येणारे काही परदेशी नागरिक पासपोर्ट व व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भाड्याने घर-फ्लॅट घेऊन वास्तव्य करीत असल्याचे विविध पोलीस कारवायांवरुन निदर्शनास आले आहे. यातील बहुतेक जण अमली पदार्थांची तस्करी, तसेच गुन्हेगारी कारवाया करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी बेकायदा वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्याची कार्यवाही सुरु केली आहे. तसेच अशा परदेशी नागरिकांना घर-फ्लॅट भाड्याने देणाऱ्या व त्यांची माहिती स्थानिक पोलिसांना न देणाऱ्या घर मालक व सोसायट्यांची पोलिसांनी झाडाझडती सुरु केली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची खरेदी-विक्री होत असल्याचे तसेच या अमली पदार्थाच्या आहारी शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी व तरुणवर्ग जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अमली पदार्थाच्या तस्करीत परदेशी नागरिक सक्रिय असल्याचे पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या कारवायांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबईत बेकायदेशीरित्या वास्तव्यास राहून अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून परदेशी नागरिकांची झाडाझडती सुरु केली आहे.