| पनवेल | वार्ताहर |
मेरीडाईन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या 32 ट्रेलर वाहनाचे स्पिड गव्हर्नर प्रमाणपत्र ऑनलाइन नोंदणी करण्याकरिता 32 हजाराची मागणी केल्याप्रकरणी पनवेल आरटीओतील कनिष्ठ लिपीक संदीप संभाजी बासरे यांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच ही समाजाला लागलेली एक कीड आहे. बक्कल पगार असतांनाही शासकीय काम करून देण्यासाठी अधिकारी व कर्मचार्यांकडून लाच स्विकारली जात आहे. त्यात पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय अग्रेसर असल्याचे सोमवारी झालेल्या कारवाईत दिसून आले आहे. मेरीडाईन कंपनीच्या 32 ट्रेलरचे स्पिड गव्हर्नर प्रमाणपत्र ऑनलाइन नोंदणी करण्याकरिता प्रत्येकी 1 हजार रुपये प्रमाणे 32 गाड्यांचे 32 हजार रुपयाची मागणी आरटीओतील कनिष्ठ लिपीक संदिप बासरे यांनी केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्याकडे तक्रारदाराने रितसर तक्रार दाखल केली होती.
त्या तक्रारीनुसार बासरे पैशाची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले. एसीबीकडून सापळा लावण्याचे ठरले. सोमवारी बासरे यांनी संपूर्ण रक्कम न घेता 15 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 13 हजार रुपये देण्याचे ठरले. सोमवारी एसीबीच्या अधिकारी यांनी पनवेल आरटीओ कार्यालयात सापळा लावला असता कनिष्ठ लिपीक संदीप बासरे ( वय 45 वर्ष ) यांनी रक्कम स्विकारताना रंगेहात पकडले. त्याचबरोबर यासाठी मदतनिस म्हणून खासगीत काम करणारे कल्पेश कडू (वय 31 वर्ष ) , कपिल पाटील ( वय 45 वर्ष ) या तिघांनाही एसीबीने ताब्यात घेतले. त्यानंतर कळंबोली पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच प्रकरणी पनवेल आरटीओ चर्चेत
लाच मागितल्या प्रकरणी वारंवार होणा-या कारवाईतून पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय चर्चेत आले आहे. 2023 मध्ये कारवाई झाल्यानंतर लागलीच डिसेंबर 2024 मध्ये सोमवारी कारवाई झाली आहे. आरटीओ कार्यालय स्थापन झाल्यापासून ही चौथी कारवाई झाली आहे. त्यात सहाय्यक आरटीओ अधिकारी, खासगी मदतनिस, खासगी एजेंट ,कनिष्ठ लिपीक यांचा समावेश आहे.