ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धा

सहा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

। कोल्हापूर । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्यावतीने आयोजित 19व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या स्वराज ढमढेरे, नील केळकर, पश्‍चिम बंगालच्या संकल्प सहानी, शौनक चॅटर्जी, कर्नाटकच्या निकित कोरीशेत्रु, आंध्रप्रदेशच्या लक्ष्य चुक्का यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.

कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात बिगरमानांकीत महाराष्ट्राच्या स्वराज ढमढेरेने सहाव्या मानांकित अहान शेट्टीचा टायब्रेकमध्ये 6-7(5), 6-3, 6-0 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. महाराष्ट्राच्या नील केळकर याने तामिळनाडूच्या अकराव्या मानांकित प्रत्युश लोगनाथनचा 3-6, 7-6(3), 6-1 असा तर, पश्‍चिम बंगालच्या शौनक चॅटर्जीने मध्यप्रदेशच्या नवव्या मानांकित रुद्र बाथमचा 7-5, 6-2 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.

पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या आंध्रप्रदेशच्या लक्ष्य चुक्काने महाराष्ट्राच्या सोळाव्या मानांकित सार्थक गायकवाडचा 1-6, 6-3, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. पश्‍चिम बंगालच्या संकल्प सहानीने हरियाणाच्या चौदाव्या मानांकित त्रिशुभ कुमारचा 6-2, 6-2 असा पराभव केला. कर्नाटकच्या निकित कोरीशेत्रुने महाराष्ट्राच्या तेराव्या मानांकित मनन अगरवालचे आव्हान 6-3, 7-6(1) असे मोडीत काढले.

Exit mobile version